मुंबई: मैदानातील हेलिपॅडला विरोध करणाऱ्या विश्वविक्रमी क्रिकेटपटू प्रणव धनावडेच्या वादावर पडदा पडला आहे. ताब्यात घेतलेल्या प्रणव आणि त्याच्या वडिलांना पोलिसांनी सोडलं आहे.


त्याआधी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही प्रणवची पाठराखण करत, आपण कल्याणच्या कार्यक्रमाला हेलिकॉप्टरनं नाही तर कारने जाणार असल्याचं स्पष्ट केलं.

मैदानावर हेलिपॅड योग्य नाही, तसंच प्रणव धनावडेचं म्हणणं योग्य आहे, असं जावडेकरांनी म्हटलं.

काय आहे प्रकरण?

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर हे रविवारी एका खाजगी कार्यक्रमासाठी डोंबिवलीत येणार आहेत. त्यासाठी त्यांचं हेलिकॉप्टर कल्याण पश्चिमेकडील सुभाष मैदानात उतरणार होतं. त्यासाठी मैदानावर हेलिपॅड बनवण्यात येत आहे. मात्र या हेलिपॅडमुळे स्थानिक खेळाडूंना त्रास झाला. त्यामुळे विक्रमीवर क्रिकेटपटू प्रणव धनावडेने त्याला विरोध केला होता.

मात्र विरोध करणाऱ्या प्रणव धनावडेला पोलिसांनी धक्काबुक्की करुन, त्याला आणि त्याच्या वडिलांना पोलिस स्टेशनमध्ये घेऊन गेले.

याबाबतची माहिती समजल्यानंतर स्थानिक शिवसैनिकांनी तातडीने पोलिस स्टेशनकडे धाव घेतली. त्यामुळे पोलिस स्थानकात तणावाचं वातावरण होतं.

दरम्यान, याबाबत एबीपी माझाने केंद्रीय मंत्री जावडेकरांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यांनीही प्रणव धनावडेची पाठराखण करत, मैदानावर हेलिपॅड बनवणं चुकीचं असल्याचं नमूद केलं. तसंच आपण हेलिकॉप्टरने नव्हे तर कारनेच कार्यक्रमस्थळी जाणार असल्याचं स्पष्ट केलं.

संबंधित बातमी


विक्रमवीर क्रिकेटपटू प्रणव धनावडे पोलिसांच्या ताब्यात