नवी दिल्ली : नोटाबंदी हा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे, असं म्हणणाऱ्या राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधातले पुरावे जगजाहीर करावेत, असं आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे. शिवाय पंतप्रधानांची नियत चांगली नसल्याचा घणाघातही केजरीवाल यांनी केला आहे.


मोदी आणि राहुल गांधी यांच्या भेटीवरुनही केजरीवालांनी टीकास्त्र सोडलं आहे. मोदी आणि राहुल गांधींमध्ये डील तर झाली नाही ना, अशी खोचक शंका केजरीवालांनी उपस्थित केली आहे. केजरीवालांनी ट्वीट करुन तसा जाहीर प्रश्नच राहुल गांधींना विचारला आहे. राहुल यांनी पुरावे सार्वजनिक न केल्यास देश त्यांना कधीच माफ करणार नाही, असा टोलाही केजरीवालांनी हाणला.

राहुल गांधींनी केजरीवालांना उत्तर देताना पंतप्रधानांची भेट घेतल्याचं एक व्हिडिओ शेअर करत ट्विटरवर जाहीर केलं आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न मोदींपुढे मांडला असून त्यांना कर्जमाफी देत दिलासा देण्याची मागणी केल्याचंही राहुल यांनी स्पष्ट केलं.

राजकीय पक्षांच्या बँक खात्यात जुन्या पाचशे-हजाराच्या नोटा जमा झाल्या तरी त्या रकमेवर कोणताही कर लावला जाणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं. त्यामुळे केजरीवाल यांनी काँग्रेससह भाजपच्या भूमिकेवर शंका व्यक्त केली आहे. मोदी राजकीय पक्षांचा काळा पैसा पांढरा करु पाहत असल्याची टीका त्यांनी केली.

https://twitter.com/ArvindKejriwal/status/809955438112305152

https://twitter.com/OfficeOfRG/status/809660440212971525