नवी दिल्ली  : ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कुठल्याच कायद्यांतर्गत नोंदणीच झालेली नाही. नोंदणी नसलेल्या संघटनेकडे एके-47 सारखी शस्त्रं येतात कुठून?’ असा गंभीर आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या विजयादशमीच्या शस्त्र पूजनावर आक्षेप घेतला आहे. तसेच रा. स्व. संघाकडील सर्व शस्त्रास्त्रं जप्त करावीत अशी मागणीही त्यांनी केली आहे.

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नोंदणीकृत करण्यासाठी पंतप्रधानांनी 10 दिवसांत आदेश द्यावेत.’ अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

दरम्यान, ऐन विजयादशमीच्या मुहूर्तावर प्रकाश आंबेडकरांनी संघाविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानं आता सरकार याप्रकरणी नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणंही महत्त्वाचं आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून विजयादशमीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. या कार्यक्रमावेळी सरसंघचालकांच्या हस्ते शस्त्रांचे पूजन केलं जातं. त्यानंतर सरसंघचालक सर्व स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतात. आता याच कार्यक्रमाला प्रकाश आंबेडकरांनी आक्षेप घेतला आहे.