शिमला : कोरोनाच्या संकटात हिमाचल प्रदेशमध्ये पीपीई किट घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी हिमाचल प्रदेश भाजप अध्यक्ष राजीव बिंदल यांनी राजीनामा दिला आहे. पीपीई किट घोटाळ्यात त्यांचा हात असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. त्यामुळं नैतिक जबाबदारी घेत राजीनामा असल्याचं राजीव बिंदल यांनी म्हटलं आहे. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी अत्यंत महत्वाचे असलेल्या या पीपीई किट खरेदीसंबंधी अधिकाऱ्याच्या संभाषणाची कथित ऑडीओ क्लिप व्हायरल झाली होती. यामुळे पीपीई किट खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले होते.


या प्रकरणात एक 43 सेकंदाची ऑडीओ क्लिप समोर आली होती. त्यात आरोग्य संचालक डॉ. अजयकुमार गुप्ता हे पीपीई पुरवठादाराकडे 5 लाख रुपयांची लाच मागत असल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणी गुप्ता अटकेत आहेत. यात बिंदल यांचाही सहभाग असल्याचा आणि भाजप अध्यक्ष बिंदल यांनी टेंडर दिलं असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. त्यामुळं आज बिंदल यांनी राजीनामा दिला.

या क्लिपमध्ये करोडो रुपयांच्या देवाण-घेवाणीचा उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरणात भाजपा नेत्यांची नावे घेतली जात होती. यामुळे राजीव बिंदल यांनी नड्डा यांना पाठविलेल्या राजीनाम्यामध्ये याचे कारण दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून कथित ऑडीओ क्लीप व्हायरल होत आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश सरकारने त्याविरोधात कारवाई केली आहे. गुन्हा दाखल करून त्या अधिकाऱ्याला अटकही करण्यात आली आहे.

या प्रकरणात काही लोक भाजपाकडे बोट दाखवत आहेत. यामुळे मी भाजपाचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करता यावी यासाठी नैतिकतेमुळे राजीनामा देत आहे, असे म्हटले आहे. बिंदल यांची साडेचार महिन्यांपूर्वीच भाजप अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.

हिमाचल प्रदेश कांग्रेस अध्यक्ष कुलदीप सिंह राठौर आणि विधिमंडळ गटनेते मुकेश अग्निहोत्री यांनी कोरोना व्हायरसच्या या महामारीत हिमाचल प्रदेशच्या आरोग्य विभागात झालेल्या या भ्रष्टाचाराच्या पापातून भाजप सुटू शकत नाही, असं म्हटलंय.  मुख्यमंत्री जयराम ठाकूर देखील या प्रकरणी जबाबदार आहेत. कारण आरोग्य विभागाचा अतिरिक्त कारभार त्यांच्याकडे आहे, असंही त्यांनी म्हटलंय.