नवी दिल्ली : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढताना दिसत आहे. या व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात मागील 24 तासांमध्ये 6566 कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर 194 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत या महामारीमुळे संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 58 हजारांहून अधिक झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 1 लाख 58 हजार 333 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 4531 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 67,692 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.


कोणत्या राज्यात किती रुग्णांचा मृत्यू?


आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रामध्ये 1897, गुजरातमध्ये 938, मध्यप्रदेशमध्ये 313, दिल्लीत 303, तामिळनाडूमध्ये 133, तेलंगणामध्ये 63, आंध्रप्रदेशमध्ये 58, कर्नाटकात 47, उत्तर प्रदेशमध्ये 182, पंजाबमध्ये 40, पश्चिम बंगालमध्ये 289, राजस्थानमध्ये 173, जम्मू-काश्मीरमध्ये 26, हरियाणामध्ये 18, झारखंडमध्ये 4, बिहारमध्ये 15, आसाममध्ये 4, हिमाचलप्रदेशमध्ये 5, ओडिशामध्ये 7 आणि मेघालयमध्ये एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे.


पाहा व्हिडीओ : देशभरात 24 तासात 3256 नवे कोरोनाबाधित तर 194 रुग्णांचा मृत्यू



26 दिवसांमध्ये 3543 श्रमिक ट्रेनमधून 48 लाख प्रवाशी घरी परतले


भारतीय रेल्वेने 27 मेपर्यंत 3543 श्रमिक स्पेशल ट्रेन सोडल्या आहेत. या दरम्यान, 26 दिवसांमध्ये 48 लाख प्रवाशांना त्यांच्या राज्यांमध्ये सोडण्यात आलं आहे. रेल्वेने सांगितलं की, यादरम्यान, प्रवाशांमध्ये 78 लाख जेवणाचे पॅकेट्स आणि 1.10 कोटी पाण्याच्या बाटल्या वाटण्यात आल्या आहेत. 26 मे रोजी 255 श्रमिक स्पेशल ट्रेन्स सुरु करण्यात आल्या आहेत.


3543 स्पेशल ट्रेन्सपैकी सर्वाधिक ट्रेन्स पाच राज्यांमध्ये चालवण्यात आल्या आहेत. यामध्ये गुजरातमध्ये 946, महाराष्ट्रात 677, पंजाबमध्ये 377, उत्तर प्रदेशमध्ये 243 आणि बिहारमध्ये 215 रेल्वे सुरु करण्यात आल्या आहेत. येथे ज्या पाच राज्यांमध्ये ट्रेन सर्वात जास्त पोहोचल्या त्यांमध्ये उत्तर प्रदेशात 1392, बिहारमध्ये 1123, झारखंडमध्ये 156, मध्यप्रदेशमध्ये 119 आणि ओडिशामध्ये 123 ट्रेन्स सहभागी आहेत.


संबंधित बातम्या : 


मोदी सरकारविरोधात काँग्रेसचं आज ऑनलाईन आंदोलन, सोनिया-राहुल गांधींसह 50 लाख कार्यकर्त्यांचा सहभाग


चीनसोबत तणाव, पंतप्रधान नरेंद्र मोदींची लष्करप्रमुखांसोबत बैठक, तिन्ही दलांनी दिल्या तयारीच्या ब्लूप्रिंट


हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनमुळे कोणताही धोका नाही, WHO च्या बंदीनंतर ICMR चं स्पष्टीकरण