नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळण्यात यश आलं आहे. सीआरपीएफच्या जवानांनी पुलवामातील अयानगुंज परिसरात एक सॅन्ट्रो गाडी ताब्यात घेतली असून या गाडीतून मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. या गाडीत आयईडीचाही वापर करण्यात आला होता. जवानांना गाडी आढळून आली, त्यानंतर गाडीची तपासणी केली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटकं आढळून आली.


मिळालेल्या माहितीनुसार, गाडीला त्या ठिकाणाहून दुसरीकडे घेऊन जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे सुरक्षा दलाने त्या गाडीला त्याच ठिकाणी नियंत्रित विस्फोटकांमार्फत उडवून दिलं. या गाडीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर विस्फोटकं होती की, ज्यावेळी सैन्य दलाकडून नियंत्रित विस्फोटकांमार्फत उडवून देण्यात आलं, त्यावेळी आसपासच्या परिसरात असलेल्या घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून मोठ्या प्रमाणावर आवाजही झाला होता.


सुरक्षा दलाच्या तुकडीला पांढऱ्या रंगाची सॅन्ट्रो गाडी संशयित परिस्थितीत अयानगुंज परिसरात आढळून आली. तपासणीदरम्यान त्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटकं असल्याचं आढळून आलं. जर गाडी त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तर रस्त्यातच स्फोट होण्याची शक्यता होती. त्यामुळे गाडी आहे त्याच ठिकाणी नियंत्रित विस्फोटकांमार्फत उडवून देण्याचा निर्णय सुरक्षा दलांनी घेतला. गाडीमधील विस्फोटकांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर होतं. त्यामुळे आसपासचा परिसर रिकामा करण्यात आला.



एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 'पुलवामामध्ये मोठ्या घातपात घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा मोठा डाव होता. मात्र, पुलवामा पोलीस, सीआरपीएफ आणि भारतीय सैन्य दलाच्या सतर्कतेमुळे हा डाव उधळून लावण्यात यश आलं. तीनही दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईमुळे वाहनाद्वारे आयइडी स्फोट घडवून आणण्याचा कट उधळून लावण्यात आला, अशी माहिती काश्मीर झोन पोलिसांनी दिली आहे.


असं सांगण्यात येत आहे की, पुलवामामध्ये 2019 सारख्या आणखी एका दहशतवादी हल्ला घडवून आणण्यासाठी या गाडीचा वापर करण्यात येणार होता. परंतु, सुरक्षा दलांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.


14 फेब्रुवारी 2019 रोजी झाला होता पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला


गेल्या वर्षी 14 फेब्रुवारी रोजी सीआरपीएफच्या ताफ्यावर स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा वापर करून दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात देशातील 40 जवान शहीद झाले होते. जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेल्या गाडीने सुरक्षा रक्षकांना घेऊन जाणाऱ्या बसवर धडक दिली होती.