नवी दिल्ली : जीएसटीनंतर वीज बिल वाढण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. कारण जीएसटी कौन्सिलने कोळसा 5 टक्के टॅक्स स्लॅबमध्ये ठेवला आहे. त्यामुळे वीज स्वस्त होईल, अशी माहिती केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी दिली.


एबीपी न्यूजच्या जीएसटी संमेलन या विशेष कार्यक्रमात पीयूष गोयल बोलत होते. देशात 1 जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे. वेगवेगळे कर एका जागी आल्याने कर चोरी अत्यंत कमी होईल. जीएसटीने देशाचा चेहरामोहरा बदलणार आहे, असंही पियुष गोयल म्हणाले.

झारखंडमध्ये वीज दर वाढवण्यात आल्यानी जीएसटीनंतर देशातही वीजदरात वाढ होईल, असं बोललं जात होतं. मात्र झारखंडमधील दर वाढवण्यामागची परिस्थिती वेगळी आहे. झारखंडमधील परिस्थिती अत्यंत खराब आहे. पण जीएसटीमुळे दर वाढवण्यात आलेले नाहीत, असं स्पष्टीकरण पियुष गोयल यांनी दिलं.

जीएसटीचा राज्यांना फायदा होणार असल्याचंही पीयूष गोयल यांनी सांगितलं. केंद्राकडे जो कर जमा होईल, त्याचा अर्धा भाग राज्यांना आणि अर्धा भाग केंद्राला राहिल. त्यामुळे याचा राज्यांना जास्त फायदा होईल, असंही पियुष गोयल म्हणाले.