नवी दिल्ली : आम आदमी पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दिल्लीच्या आयटीओ इथल्या 'आप'च्या कार्यालयाबाहेर कुमार विश्वास यांच्याविरोधात पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टरवर त्यांना गद्दार आणि ते भाजपचे एजंट असून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
"भाजपा का यार है, कवि नहीं गद्दार है, छिप-छिप हमला करता है, वार पीठ पर करता है. ऐसे धोखेबाजों को बाहर करो...बाहर करो. कुमार विश्वास का काला सच खुलकर बताने के लिए भाई दिलीप पांडे का आभार." अशा घोषणा या पोस्टरवर लिहिण्यात आल्या आहेत.
परंतु हे पोस्टर कोणी लावलं, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
कुमार विश्वास यांचं उत्तर
याबाबत कुमार विश्वास यांना विचारलं असता ते म्हणाले की, "जेव्हा चांगला यज्ञ होतो, तेव्हा खर, दूषण आणि ताड़का गोंधळ घालण्यासाठी नक्कीच येतात. मागील पराभवाची कारणं कार्यकर्त्यांना माहित आहे. पाच लोकांच्या वाडा आणि बंगल्याच्या राजकारणासाठी आणि षडयंत्रासाठी आमचा जन्म झालेला नाही. आम्ही जंतर मंतरवर घडलेले आहोत."
दिलीप पांडेंचा कुमार विश्वास यांच्यावर निशाणा
काही दिवसांपासून कुमार विश्वास आणि अरविंद केजरीवाल यांच्यात वाद असल्याची चर्चा रंगली आहे. आम आदमी पक्षाचे नेते दिलीप पांडे यांनी ट्वीट करुन कुमार विश्वास यांना विचारलं होतं की, ते वसुंधरा यांच्या भाजप सरकारवर प्रश्न का उपस्थित करत नाही. दिलीप पांडे यांच्या या ट्वीटनंतर 'आप'मध्ये वाद झाला होता. मात्र दिलीप पांडे यांच्या ट्वीटनंतर कुमार विश्वास यांनी मौन बाळगलं होतं.
https://twitter.com/dilipkpandey/status/874817460741877760