नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकसंख्या नियंत्रणात राहण्यासाठी देशात आता 2 अपत्यांच्या कायद्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे. आरएसएसचा पुढचा अजेंडा लोकसंख्या कायद्याचा असू शकतो, असंही भागवत यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका बैठकीत मोहन भागवत बोलत होते.


दोन अपत्यांच्या कायद्यासंदर्भात देशभरात संघाकडून जनजागृती अभियान राबवलं जाणार आहे. मुरादाबादमध्ये मोहन भागवत यांनी बंद दाराआड झालेल्या एका चर्चेत देशात दोन मुलं जन्माला घालण्याचा कायदा आणला पाहिजे, असं म्हटलं आहे. याशिवाय येत्या काळात भव्य राम मंदिराची निर्मिती करण्यात येणार आहे. राम मंदिर ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून संघाच्या अंजेड्यावर असलेल्या राम मंदिराच्या मुद्दा बाजूला होईल. त्यामुळे देशातील वाढती लोकसंख्या हा चिंतेचा विषय आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी दोन अपत्य जन्माला घालण्याचा कायदा करण्याची आवश्यकता आहे, असं मोहन भागवत यांनी सांगितल्याची माहिती आहे.


दोन अपत्य असतील तर निवडणूक लढणं, सरकारी योजनांमध्ये अनेक अटी आणि नियम याआधीच आहेत. त्यामुळे यासंदर्भात राज्यात कायदा असताना हा विषयच येत नाही, असं राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावाने नव्या संविधानाच्या पुस्तकाचा प्रसार केला जात आहे. नया भारतीय संविधान असं या पुस्तकाचं नाव असून सोशल मीडियावर हे पुस्तक व्हायरल होत आहे. मात्र या पुस्तकाशी मोहन भागवत यांचा काहीही संबंध नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोहन भागवत यांची बदनामी करण्याचा हा डाव असल्याचा आरोप संघाने केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ चौकशी व्हावी अशी मागणी संघाने केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेलं पुस्तक कुणी लिहिल? कुणी छापलं? याची चौकशी झाली पाहिजे. लखनौ पोलीस याचा तपास करत आहेत. या पुस्तकाच्या पहिल्या पानावर मोहन भागवत यांचा फोटोही आहे.