Poonch Terror Attack : भारतीय लष्कराने (Indian Army) जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये (Poonch) गुरुवारी (20 एप्रिल) ट्रकवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Terror Attack) शहीद झालेल्या पाच जवानांची नावे जाहीर केली आहेत. हवालदार मनदीप सिंह, लान्स नायक देबाशिष बसवाल, लान्स नायक कुलवंत सिंह, शिपाई हरकृष्ण सिंह आणि शिपाई सेवक सिंह अशी मृत जवानांची नावे आहेत, असं नागरोटा इथल्या लष्कराच्या 16 कॉर्प्सने सांगितलं.


"व्हाईट नाईट कॉर्प्स शहीद जवानांच्या शोकाकुल कुटुंबांसोबत एकजुटीने उभे आहे," असं ट्विटरवर म्हटलं आहे.






 


शहीद झालेले जवान भारतीय लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्स युनिटचे होते. या भागात दहशतवादविरोधी कारवायांसाठी ते तैनात होते.


पाच जवान शहीद


जम्मूमधील राजौरी सेक्टरमध्ये जात असताना पुंछ जिल्ह्यात जवानांच्या ट्रकला आग लागली. यामध्ये पाच जवान शहीद झाले आहेत तर एक जवान गंभीर जखमी झाला आहे, त्याच्यावर सैन्याच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भारतीय लष्कराने हा दहशतवादी असल्याचं म्हटलं आहे. दहशतवादी संघटना जैश समर्थित PAFF म्हणजेच पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.


पाऊस आणि कमी दृश्यमानतेचा फायदा घेत दहशतवादी हल्ला


लष्कराकडून सांगण्यात आलं की, "गुरुवारी दुपारी तीन वाजता राजौरी सेक्टरमधील भिंबर गली आणि पुंछ दरम्यान महामार्गावरुन जाणाऱ्या लष्कराच्या वाहनावर अज्ञात दहशतवाद्यांनी गोळीबार केला. दहशतवाद्यांनी ग्रेनेडचाही वापर केल्याने वाहनाला आग लागली असावी." "हल्लेखोरांनी मुसळधार पाऊस आणि परिसरातील कमी दृश्यमानतेचा फायदा घेतला," असं लष्कराने निवेदनात म्हटलं आहे. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले आणि एक जवान जखमी झाला आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन सुरु केलं असून अद्याप त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.


ग्रेनेड हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात चार दहशतवादी सहभागी असल्याचं समजतं. हल्ल्यानंतर गाडीच्या इंधन टाकीला आग लागली आणि काही वेळातच संपूर्ण वाहन आगीत जळून खाक झालं. सूत्रांच्या माहितीनुसार, हा हल्ला झाला तेव्हा जवान वाहनातून काही सामान घेऊन जात होते. जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या G-20 परिषदेपूर्वी हा नियोजित हल्ला असल्याचं म्हटलं जात आहे.


संबंधित बातमी


Army Truck Caught Fire: काश्मीर: लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला; 5 जवान शहीद