तामिळनाडूत वणव्यात अडकून पाच तरुण गिर्यारोहकांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 12 Mar 2018 08:44 AM (IST)
तामिळनाडूतील थेनी जिल्ह्यातल्या कोलुक्कुमलई भागातील जंगलात रविवारी वणवा लागला होता.
चेन्नई : वणव्यात अडकून पाच तरुण गिर्यारोहकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तामिळनाडूतील थेनी जिल्ह्यातल्या कोलुक्कुमलई भागातील जंगलात रविवारी वणवा लागला होता. मृतांमध्ये आठ ते वीस वर्षे वयोगटातील तरुणींसह पाच ट्रेकर्सचा समावेश आहे. चेन्नईतील 37 गिर्यारोहकांचे दोन गट शुक्रवारी रात्री ट्रेकिंगला निघाले होते. शनिवारी ते केरळाजवळ जंगलात पोहचले. रविवारी सकाळी पुन्हा त्यांनी तामिळनाडू सीमेलगत कुरंगिनीहून ट्रेकला सुरुवात केली मात्र दुपारच्या सुमारास कुरंगिनी हिलवर लागलेल्या वणव्यात ते अडकले. ट्रेकिंग ग्रुपने वन विभागाकडून परवानगी न घेतल्यामुळे वनाधिकाऱ्यांना याबाबत कोणतीही कल्पना नव्हती. यामध्ये पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर काही जण बेपत्ता आहेत. आतापर्यंत 28 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली असून 10 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्थानिकांच्या मदतीने बचाव पथकं अडकलेल्या गिर्यारोहकांना वाचवण्याचे प्रयत्न करत आहेत.