बंगळुरू: कर्नाटक सरकार म्हैसूरचे शासक टीपू सुलतान यांची जयंती साजरी करण्याची तयारी करत आहे. मात्र भाजपने टीपूंच्या जयंतीला तीव्र विरोध करण्यास सुरुवात केली आहे. भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते शनिवारी होणाऱ्या कार्यक्रमस्थळी आंदोलन करणार आहेत.
कोणी कितीही विरोध केला तरी 18 व्या शतकातील शासक टीपू सुलतान यांची जयंती नियोजित दिवशी साजरी केली जाईल, असे कर्नाटक सरकारने स्पष्ट केले आहे.
भारतीय जनता पक्ष आणि श्री राम सेनेचे समर्थक जयंती विरुद्ध आंदोलन करत आहेत. भाजपाने टीपू सुलतान यांना आत्याचारी शासक असल्याच म्हटलं आहे. तर केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी टीपू सुलतान हिंदू विरोधी होते, मग त्यांची जयंती साजरी करण्याची गरज काय? असं म्हटलं.
गेल्यावर्षी कॉंग्रेस सरकारने जयंती साजरी केली होती. त्यावेळीही मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. शिवाय लोकांच्या हितासाठी राज्य सरकारने टीपू सुलतानची जयंती साजरी करु नये. फक्त मुस्लीम समुदायला खुश करण्यासाठी ही जयंती साजरी केली जात असल्याचे भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी म्हटले आहे.
कर्नाटक सरकारने कार्यक्रमाचं स्थळ विधानसभा व्यातरिक्त गैर-राजकीय ठिकाणी ठेवले आहे. भाजपचा तीव्र विरोध पाहता गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन योग्य प्रकारे कायदा आणि सुव्यावस्था हाताळण्याचे आदेश दिले. तर कोणी अधिकारीक कार्यक्रमात बाधा आणण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री एच.डी कुमारस्वामी यांनी दिला आहे.