हैदराबाद : तेलंगणा राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आली तर आम्ही हैदराबादचे नाव बदलू, असे वक्तव्य भाजप नेते राजा सिंह यांनी केले आहे. डिसेंबरमध्ये तेलंगणात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राज्यात प्रचाराच्या सभा सुरु आहेत. गुरुवारी भाजपच्या एका सभेत बोलताना सिंह यांनी हैदराबादच्या नामकरणाबाबत वक्तव्य केले.
राजा सिंह म्हणाले की, '' येत्या निवडणुकांमध्ये पक्षाला सत्ता मिळाली तर, हैदराबादसह राज्यातील अन्य शहरांची नावी बदलली जातील. अन्य शहरांना देशातल्या महापुरूषांची नावे दिली जातील. १६ व्या शतकात कुतुबशहाच्या वंशजांनी भाग्यनगरचे नाव बदलून हैदराबाद ठेवले. तसेच कुतुबशहाने इतरही अनेक शहरांची नावे बदलली आहेत, त्यामध्ये सिकंदराबाद आणि करीमनगरचा समावेश आहे. या शहरांचे आम्ही सत्तेत आल्यावर नाव बदलू''.
यावेळी राजा सिंह यांनी एमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसींवर टिका केली. सिंह म्हणाले की, ''राज्यातील मुस्लिम जनतेने ओवैसीवर विश्वास ठेवू नये. ओवैसी जरी हैदराबादमधील खासदार असले ते अनेकदा तेलंगणाच्या विरोधात बोलले आहेत''.