नवी दिल्ली : सामर्थ्यशाली भारतीय सैन्यदलाची ताकद आता अजून वाढणार आहे. भारताच्या शत्रूंविरोधात लढण्यासाठी सैन्याच्या ताफ्यात आता दोन नव्या महाकाय तोफा दाखल होणार आहेत. एम 777 अल्ट्रालाईट होवित्झर आणि के. 9 वज्र या दोन अत्याधुनिक परदेशी तोफा भारतीय सैन्याला मिळणार आहेत. भारतीय सैन्यदलाच्या नाशिकमधील देवळाली येथील प्रशिक्षण केंद्रात या तोफा लवकरच दाखल होतील.

देवळाली येथील तोफखाना केंद्रात एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन आणि लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांच्या उपस्थितीत या तोफांचे हस्तांतरण केले जाणार आहे. त्यासाठी देवळाली येथे सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.


पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार के.9 वज्र या तोफांवर 4,366 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. त्यानुसार 100 तोफा भारताला मिळणार आहे. त्यापैकी 10 तोफा आत्ता, 40 तोफा नोव्हेंबर 2019 मध्ये आणि उरलेल्या 50 तोफा नोव्हेंबर 2020 मिळतील. के.9 वज्र ही तोफ 28 ते 38 किलोमीटर क्षेत्रापर्यंत मारा करु शकते. ही 30 सेकंदामध्ये तीन तोफगोळे आणि तीन मिनिटांमध्ये 15 तोफगोळ्यांचा मारा करू शकते. विशेष म्हणजे ही तोफ रात्रीच्या वेळीदेखील अचूक लक्ष्यभेद करु शकते. 'सस्टेन मोड'वर एका तासात ही तोफ 60 तोफगोळे फेकू शकते. 50 ते 80 किलोमीटर प्रतितास वेगाने ही तोफ धावू शकते.


सर्व तोफा भारतीय सैन्याच्या ताफ्यात दाखल होण्यासाठी दोन वर्षांचा वेळ लागेल. के.9 वज्रसह एम 777 अल्ट्रालाईट होवित्झर या तोफेसाठी 5 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. 2021 पर्यंत एकूण 145 होवित्झर तोफा सैन्यदलाकडे सोपवल्या जातील. या तोफेचे वजन 4.2 टन इतके आहे.