नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनामुळे राजधानी दिल्लीच्या सीमेवर सध्या वातावरण चांगलेच तापलेले आहे. या आंदोलक शेतकऱ्यांना देशा-विदेशातून पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनाला खेळांडूनी पाठिंबा दिला असून आपला पुरस्कार परत करण्यासाठी काही माजी खेळाडूंनी राष्ट्रपती भवनाची वाट धरली. परंतु राष्ट्रपती भवनकडून राष्ट्रपतींच्या भेटीची वेळ न मिळाल्याने पोलिसांकडून खेळाडूंना रस्त्यातचं अडवण्यात आले. त्यामुळे पुरस्कार परत न करताच हे खेळाडू माघारी आले आहे.


पद्मश्री विजेते, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार, गुरू द्रोणाचार्य पुरस्काराबरोबर राष्ट्रीय पुरस्कार विजेते खेळाडू सहभागी होते. राष्ट्रपती भवनाकडून राष्ट्रपतींच्या भेटीची वेळ मिळाल्यानंतर पुन्हा हे खेळाडू अवॉर्ड वापसीसाठी जाणार आहे. दिल्लीतल्या प्रेस क्लब पासून राष्ट्रपती भवनापर्यंत त्यांना मार्च करायचा होता पण पोलिसांनी रोखले. शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पंजाब हरियाणामधल्या खेळाडूंनी आपले पुरस्कार परत करायला एका गाडीत भरून आणले होते.


नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने उद्या 8 डिसेंबरला 'भारत बंद' पुकारण्यात आला आहे. गेल्या 12 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. 9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे.


शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला देशातील अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, बसपा, पीएजीडी, एसीपी, सीपीआई, सीपीएम, सीपीआई (एलएल), आरएसपी, आरजेडी, डीएमके, एआयएफबी, जेएमएम, टीआरएस, आम आदमी पार्टी, राष्ट्रीय लोकशाही पार्टी यामध्ये प्रमुख पक्षांचा समावेश आहे.  शेतकरी जर आपल्या मागण्यांसाठी एक दिवसाचा बंद करत असतील तर जनतेने स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी होऊन आपल्या अन्नदात्याच्या मागे ठामपणे उभे राहावे, असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.



संबंधित बातम्या :