नवी दिल्ली : केंद्र सरकारमार्फत लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्याविरोधात देशात गदारोळ माजल्याचं पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी दिल्लीला वेढा दिला आहे. तसेच 8 डिसेंबरला देशव्यापी बंदची हाक दिली आहे. शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारकडे कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच विरोध पक्षांच्या वतीनेही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यात येत आहे. अशातच केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे.
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी विरोधी पक्षांवर हल्लाबोल करत म्हटलं आहे की, "शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या विरोधी पक्षांची दुहेरी आणि लज्जास्पद वृत्ती समोर आली आहे. रविशंकर प्रसाद पुढे बोलताना म्हणाले की, "हे विरोधी पक्ष आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी आंदोलनात सहभागी झाले आहेत. विरोधी पक्षांचं काम केवळ मोदी सरकारला विरोध करणं एवढंच आहे."
रविशंकर प्रसाद पुढे बोलताना म्हणाले की, "आम्ही विरोधी पक्ष, विशेषतः काँग्रेस, राष्ट्रवादी आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर पक्षांच्या लज्जास्पद दुहेरी मानसिकता देशासमोर आणण्यासाठी आलो आहोत. जेव्हा यांचं राजकीय अस्तित्व संपत आलं आहे, त्यावेळी ते वाचवण्यासाठी ते कोणत्याही सरकार विरोधी आंदोलनात सहभागी होत आहेत." रविशंकर प्रसाद म्हणाले की, "जे आम्ही केलं, यूपीए सरकारही तेच करत होती."
विरोध करण्याची मिळाली संधी
रविशंकर प्रसाद म्हणाले की, "शेतकरी आंदोलक नेत्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, राजकीय लोकांनी आमच्या आंदोलनात सहभागी होऊ नये. आम्ही त्यांच्या भावनांचा आदर करतो. परंतु, तरि देखील हे सर्वजण उड्या मारत आहेत. कारण त्यांना भाजप आणि नरेंद्र मोदी यांना विरोध करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे."
शेतकरी विरोधी असल्याचा आरोप
कृषी कायद्याच्या विरोधात मागील काही दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सिमांवर धडक दिली आहे. दिल्लीच्या वेशींवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. उद्या शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. ज्याला अनेक विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. तसेच शेतकरी आंदोलनावरून विरोध सतत मोदी सरकारवर आरोप करत आहेत. त्यामुळे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी विरोधी पक्षांना खडे बोल सुनावले आहेत.
दरम्यान, नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने उद्या 8 डिसेंबरला 'भारत बंद' पुकारण्यात आला आहे. गेल्या 12 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. 9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. अशा परिस्थितीत 8 डिसेंबरला 'भारत बंद' कसा होईल, हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. दरम्यान या बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :