कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये दोन वेगवेगळ्या कारमधून 10 कोटी रुपयांच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. नाकाबंदीदरम्यान कानपूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
यातील एक गाडी हमीरपूरला जात होती, तर दुसरी लखनऊला जात होती. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कानपूरमध्ये मंगळवारी दिवसभर वाहनांची तपासणी सुरु होती. यावेळी खासगी गाड्यांमध्ये कोट्यवधी रुपये सापडले.
या दोन्ही गाड्यांमधील लोकांकडे चौकशी केली असता, त्यांच्याकडे एवढी रक्कम जवळ बाळगण्याबद्दलची कोणतीही कागदपत्र आढळून आलेली नाही. त्यामुळे ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी आयकर आणि निवडणूक अधिकाऱ्यांना यासंदर्भातील माहिती दिली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गाडीतून पैसे घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी दहा कोटी रुपये जप्त केले आहेत.
सर्वाधिक रक्कम अलाहाबाद बँक आणि अलाहाबाद ग्रामीण बँकांची असल्याचं कळतं. आयकर विभागाचे अधिकारी तपास करत आहे. जप्त कलेली रक्कम बँक आणि व्यापाऱ्यांची असल्याचं सांगितलं जात आहे.