मुंबई : नोटाबंदीनंतरच्या दोन महिन्यात बँकांमध्ये जमा झालेल्या रकमेपैकी तब्बल 3 ते 4 लाख कोटी रुपये बेहिशेबी असल्याचा दावा आयकर खात्यानं केला आहे. त्यामुळे लवकरच यासंदर्भात चौकशी होण्याची शक्यता आहे.


आयकर खातं आणि ईडीनं 16 हजार कोटींची रक्कम सहकारी बँकांच्या विविध खांत्यामध्ये भरण्यात आल्याची माहिती दिली आहे. तसंच प्रादेशिक ग्रामीण बँकामध्येही 30 हजार कोटींची रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

नोटाबंदीनंतर जाहीर झालेल्या आकडेवारीत फक्त दीड लाख कोटी रुपयांचा काळा पैसा नष्ट झाल्याची माहिती पुढे आली होती. मात्र आयकरच्या या नव्या दाव्यात तथ्य निघाल्यास नोटाबंदीच्या निर्णयामागचा हेतू सफल ठरु शकतो.

अनेक बँक खाती जी यापूर्वी कधीही व्यवहारात नव्हती, त्या खात्यांमध्येही कोट्यवधी रुपये जमा झाले आहेत. तसंच बँकांकडून घेतलेली कर्ज लोकांनी रोखीनं फेडल्यानं आयकर खात्याला मोठ्या काळ्याबाजाराचा संशय आहे. या व्यवहारांबाबत चौकशी करण्यात येणार असून नोटाबंदीनंतर किती काळा पैसा बाहेर आला हेही स्पष्ट होईल.