बंगळुरु : पोलिसांच्या हप्तेखोरीच्या घटना काही नवीन नाहीत. पैशापासून छोट्यामोठ्या वस्तूंची वसुली पोलिस कर्मचारी करत असल्याचं ऐकायला मिळतं. बंगळुरुमध्ये एका पोलिसाला शेंगदाणे वसुलीमुळे आपली नोकरी गमावावी लागली आहे.
कर्नाटक पोलिस दलातील सहाय्यक हेड कॉन्स्टेबल मंडाक्की कामावर जात असताना अनेक शेंगदाणे विक्रेत्यांकडून वसुली करत होते. हा प्रकार रोजचाच असल्याने अनेक विक्रेते वैतागले होते.
शेंगदाणे वसुलीचा हा प्रकार बाजापेठेतील एका ग्राहकानं आपल्या मोबाईलमध्ये शूट केला. 'लाच मागण्याची नवी पद्धत' अशा कॅप्शनसह हा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला.
काही तासातच हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला. डीसीपी बी. जी. थिमनवर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. अखेर, चौकशीत दोषी आढळलेल्या मंडाक्की याला डीसीपींनी निलंबित केलं.