बेळगाव : मराठा मोर्चाच्या आयोजकांना हेतुपुरस्सर त्रास द्यायचा निश्चयच पोलिसांनी केला आहे . शनिवारी मराठा मोर्चाचे संयोजक प्रकाश मरगाळे यांना खडेबाजार पोलीस स्थानकात विनाकारण बोलावून घेऊन दोन तास बसवून ठेवले. कार्यकर्ते आणि वकिलांनी पोलीस स्थानकाकडे धाव घेतल्यावर पोलिसांनी अखेर सोडून दिले.
येनकेन प्रकारे दबावतंत्राचा वापर मराठा मोर्चाच्या कार्यकर्ते आणि संयोजकांवर करायचा असे धोरण पोलिसांनी अवलंबल्याचे दिसत आहे. यापूर्वी देखील मराठा मोर्चाच्या संयोजकांकडून पाच लाखाचे हमीपत्र घेतले गेले आहे.
'मी बेळगावचा ,बेळगाव महाराष्ट्राचे' असे लिहिलेले टी-शर्ट विकण्यास तुम्हीच परवानगी दिल्याची माहिती मिळाली आहे आणि त्यामुळे तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे खडेबाजार पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक यु. एच. सातेनहळ्ळी यांनी सांगितले. "आपण फक्त साहित्याची विक्री करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. ते कोणते साहित्य विकत आहेत याची माहिती नाही. शुक्रवारी 'मी बेळगावचा ,बेळगाव महाराष्ट्राचे' याला आक्षेप पोलिसांनी घेतल्यावर स्टिकर आणि पोस्टरवर लिहिलेला मजकूर काढण्यात आला आहे. अटक करून हिंडलगा जेलला पाठवणार तर पाठवा", अशी भूमिका प्रकाश मरगाळे यांनी घेतली.
तोपर्यंत कार्यकर्ते आणि वकील मंडळी पोलीस स्थानकात दाखल झाली. त्यामुळे पोलीस उपायुक्त येऊन तुमच्याशी बोलणार आहेत, तुम्हाला नोटीस द्यायची आहे असे सांगणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी मरगाळे यांच्याकडून लेखी हमीपत्र घेऊन सोडून दिले. यावेळी पोलीस स्थानकात माजी महापौर मालोजी अष्टेकर, माजी आमदार मनोहर किणेकर, वकील महेश बिर्जे, रमेश पावले आणि राजू मरवे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
पोलिसखाते करत असलेल्या दडपशाहीचा निषेध मुंबई येथील शिवाजी मंदिरमध्ये झालेल्या सकल मराठी मोर्चाच्या बैठकीत करण्यात आला.
आजवर मराठा क्रांती मोर्चा शांततेत निघाले आहेत. मोर्चावेळी दंगा, हुल्लडबाजी झाल्याचे एकही उदाहरण नाही. असे असताना दडपशाही करणे चुकीचे आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे आम्ही पालन करू. नियमभंग मोर्चाच्या आयोजकांकडून होणार नाही, अशी ग्वाही सकल मराठा मोर्चाचे संयोजक दिलीप पाटील यांनी मुंबईहून बोलताना दिली.