पणजी: गोव्यात सुरु असलेल्या लेट नाईट पार्टी आणि अंमली पदार्थांच्या (ड्रग्स) व्यापारावर बंदी घालण्याचे आदेश मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी गृह खात्याला दिले आहेत.
लेट नाईट पार्टी आणि ड्रग्सच्या विक्रीवर पोलिसांनी बंदी आणावी: पर्रिकर
पत्रकारांशी संवाद साधताना पर्रिकर म्हणाले की, 'गृह खात्याला आदेश देण्यात आले आहेत. गोव्यात चालणाऱ्या लेट नाईट पार्टी आणि अंमली पदार्थ्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात यावी. तसेच हायवेवरील अतिक्रमण हटवण्याचेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. हायवेवर मोठ्या प्रमाणात ड्रग्सची विक्री केली जाते. त्यामुळे हे अतिक्रमण हटवण्याचे आदेश मुख्यमंत्री पर्रिकरांनी दिले आहेत.
यावेळी मुख्यमंत्री पर्रिकर यांनी सरकारी कामगारांनाही धारेवर धरलं. 'आम्हाला माहित आहे की, काही सरकारी कर्मचारी कामामध्ये ढिसाळपणा करतात. मी त्यांना सुधरण्यासाठी सात ते आठ दिवसांचा वेळ देतो. मी त्यांना यापेक्षा जास्त वेळ देऊ शकत नाही. त्यानंतर मात्र, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
दरम्यान, 24 मार्चला गोव्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. याबाबत बोलताना पर्रिकर म्हणाले की, 'राज्यातील लोकांच्या समस्या लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प तयार करण्यात येईल. माझ्याकडे अर्थसंकल्प तयार करण्यासाठी कमी वेळ होता. त्यामुळे काही नव्या गोष्टींचा त्यात समावेश करता आला नाही.'