नवी दिल्ली : मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वाचे शंभर दिवस नुकतेच पूर्ण झाले आहेत. याबरोबरच परराष्ट्र मंत्रालयाचेदेखील 100 दिवस पूर्ण झाले आहेत. यानिमित्त बोलताना परारष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानव्याप्त काश्मीर (पीओके) हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे म्हटले आहे.


जयशंकर यावेळी म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीरवरची आमची भूमिका नेहमीच स्पष्ट आणि कायम आहे. पीओके हा भारताचा भाग आहे आणि आम्ही एक दिवस त्यावर प्रत्यक्ष ताबा मिळवू, पीओके लवकरच भौगोलिकदृष्ट्या भारतात असेल.

जयशंकर म्हणाले की, कलम 370 हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. पाकिस्तानचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. पाकिस्तानचा संबंध दहशतवादाशी आहे. त्यांनी तो मुद्दा सोडवावा.

जयशंकर यांनी सार्कबद्दल बोलताना नाव न घेता पाकिस्तानवर निशाणा साधला. जयशंकर म्हणाले की, सार्क दक्षिण आशियातील देशांची संघटना आहे. केवळ व्यापार आणि दळणवळणाशी सार्कचा संबंध आहे. दहशतवादाशी त्याचा काहीही संबंध नाही. जर कोणी सार्क आणि दहशतवादाचा संबंध जोडू पाहात असेल तर, कोणता देश सार्कला पुढे नेतोय आणि कोणता देश दहशतवादाला प्रोत्साहन देतोय, याचा विचार सार्क देशांनी करायला हवा.