फायरस्टार इंटरनॅशनल डायमंड्स ग्रुपचा अध्यक्ष विपुल अंबानी याच्यासोबत तीन फर्म्सच्या कार्यकारी सहाय्यक कविता मणकिकर, फायरस्टार ग्रुपचा वरिष्ठ अधिकारी अर्जुन पाटील, नक्षत्र आणि गीतांजली ग्रुपचा सीएफओ कपिल खंडेलवाल आणि गीतांजली ग्रुपचा व्यवस्थापक नितेन शाही यांना अटक करण्यात आली.
यापूर्वी पीएनबीच्या मुंबईतील ब्रिच कँडी ब्रँचचा तत्कालीन शाखा उपव्यवस्थापक (डेप्युटी ब्रँच मॅनेजर) गोकुळनाथ शेट्टी, सिंगल विंडो ऑपरेटर मनोज खराज आणि निरव मोदी ग्रुप ऑफ फर्म्सचा अधिकृत स्वाक्षरीकर्ता (ऑथराईज्ड सिग्नेटरी) हेमंत भट याला अटक करण्यात आली आहे.
नीरव मोदीच्या उलट्या बोंबा
हे प्रकरण सार्वजनिक केल्यामुळे पीएनबीने कर्ज वसुलीचे सर्व मार्ग बंद केले आहेत, असं नीरव मोदीने पत्र लिहून म्हटलं आहे. देशातला सर्वात मोठा कर्ज घोटाळा करणाऱ्या नीरव मोदीने उलट्या बोंबा ठोकणं सुरु केलं आहे.
पीएनबीने आपल्या कंपन्यांवर असलेलं कर्ज वाढवून सांगितलं असल्याचा दावाही नीरव मोदीने केला आहे. पीएनबीला 15-16 फेब्रुवारीला पत्र लिहिण्यात आलं. आपल्या कंपन्यांवर पीएनबीचं कर्ज 5 हजार कोटींपेक्षा कमी आहे, असाही दावा नीरव मोदीने केला आहे.
”चुकीच्या पद्धतीने कर्जाची आकडेवारी सांगितल्यामुळे माध्यमांमध्ये हे प्रकरण गेलं आणि चौकशी सुरु झाली. परिणामी कामही बंद झालं. प्रकरण सार्वजनिक झाल्यामुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे. आता बँकेचं कर्ज चुकतं करण्याची आमची क्षमताही धोक्यात आली आहे,” असं नीरव मोदीने म्हटलं आहे.
नीरव मोदी त्याच्या कुटुंबीयांसह जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच देश सोडून पळाला होता. बँकेने कर्जाची रक्कम वसूल करण्याच्या घाईत माझ्या ब्रँडचा व्यवसाय उद्ध्वस्त केला आहे आणि आता कर्ज वसूल करण्याचे सर्व मार्ग बंद केले आहेत, असं नीरव मोदीने बँकेला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
”पत्नीचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, तरीही तिचं नाव यामध्ये चुकीच्या पद्धतीने ओढण्यात आलं आहे. मामा मेहुल चोक्सीचं नावही तक्रारीत चुकीच्या पद्धतीने देण्यात आलं आहे. कारण, त्याचा व्यवसाय वेगळा आहे आणि आमचा काहीही संबंध नाही. त्या सर्वांना माझ्या बँकेतील व्यवहारांविषयी काहीही माहिती नाही,” असाही दावा नीरव मोदीने केला आहे.
दरम्यान, 2200 कर्मचाऱ्यांचं वेतन सध्याच्या खात्यातून देण्याची परवानगी देण्यात यावी, असंही नीरव मोदीने पत्राच्या शेवटी म्हटलं आहे. कर्मचाऱ्यांचं वेतन देण्यासाठी नीरव मोदीने बँकेला विनंती केली आहे.