नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानी बैठकीला उपस्थित असलेले दिल्लीचे मुख्य सचिव अंशु प्रकाश यांना ‘आप’च्या आमदारानं मारहाण केल्याचा आरोप होत आहे. मात्र, हा आरोप आम आदमी पक्षानं फेटाळून लावला आहे.


दरम्यान, मारहाणीच्या निषेधार्थ दिल्लीतील आयएएस अधिकारी संपावर जाण्याच्या पवित्र्यात आहेत.

तर हे सगळे आरोप बिनबुडाचे असल्याचं ‘आप’च्या नेत्याकडून सांगण्यात आलं आहे. आम आदमी पक्षाचे नेते आशिष खेतान यांनी अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत. मुख्य सचिवांच्या कार्यालयाबाहेर त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे आता दोन्ही बाजूने मारहाणीचे आरोप केले जात आहे. त्यामुळे सध्या दिल्लीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत.

दुसरीकडे केजरीवाल सरकारने याप्रकरणी माफी मागावी, अशी मागणी दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांनी केली आहे.