राष्ट्रपतींच्या उद्गारांनी कलेचं चीज, चित्रकार महेश लाड कृतकृत्य
एबीपी माझा वेब टीम | 20 Feb 2018 09:04 PM (IST)
घटनात्मक दृष्टीनं देशात सर्वोच्च प्रतिष्ठा असलेल्या वास्तूत त्यामुळे पहिल्यांदाच छत्रपती शिवरायांचं तैलचित्र लागणार आहे
नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या उद्गागारांनी माझ्या कलेचं चीज झालं. आमचे पूर्वज महाराजांच्या दरबारी होते, आज आपल्यालाही तो मान मिळाला, केवळ या एका भावनेनं आमचं सगळं कुटुंब समाधानी आहे, अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेट दिलेल्या शिवरायांच्या प्रतिमेचे चित्रकार महेश लाड यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. शिवरायांच्या या प्रतिमेनं राष्ट्रपती भवनात जी कमतरता जाणवत होती, ती पूर्ण झाली, असे भावनिक उद्गार काल राष्ट्रपतींनी दिल्लीतल्या भव्य शिवजयंती सोहळ्यात काढलेले होते. या सोहळ्यात शिवरायांची भव्य प्रतिमा भेट दिल्यानंतर कृतार्थतेनं त्यांनी या भावना व्यक्त केल्या होत्या. अतिशय उच्च प्रतीचं हे तैलचित्र राष्ट्रपती भवनाची शोभा वाढवत राहील, असेही राष्ट्रपती म्हणाले होते. घटनात्मक दृष्टीनं देशात सर्वोच्च प्रतिष्ठा असलेल्या वास्तूत त्यामुळे पहिल्यांदाच छत्रपती शिवरायांचं तैलचित्र लागणार आहे. हे तैलचित्र ज्या कलाकाराच्या हातून साकार झालं, त्या महेश लाड यांच्याशी 'एबीपी माझा'नं एक्स्क्लुझिव्ह बातचीत केली.