PNB Scam Case : पीएनबी घोटाळा (PNB Case) प्रकरणातील मुख्य आरोपी आणि फरार व्यावसायिक नीरव मोदीचा साथीदार सुभाष शंकर (Subhash Shankar) याला इजिप्तची राजधानी कैरो (Cairo) येथून परत आणण्यात केंद्रीय अन्वेषण विभागाला (CBI) यश आलं आहे. त्याला देशात परत आणण्यासाठी सीबीआय गेल्या बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करत होती. पीएनबी बँक घोटाळा प्रकरणातील आरोपींमध्ये सुभाष शंकरचाही समावेश आहे. 


49 वर्षीय सुभाष शंकर 2018 मध्ये नीरव मोदीसोबत (Nirav Modi) भारतातून पळून गेल्याचं सांगितलं जात आहे. नीरव मोदीचा हा सर्वात जवळचा सहकारी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष शंकरला भारतात आणल्यानंतर सीबीआय आता सुभाष शंकरला मुंबई न्यायालयात हजर करणार आहे. पीएनबी घोटाळ्याप्रकरणी त्याची चौकशी केली जाणार आहे.


इंटरपोलनं जारी केलेली रेड कॉर्नर नोटीस


2018 मध्ये, इंटरपोलनं पीएनबी घोटाळ्याची चौकशी करणार्‍या सीबीआयच्या विनंतीवरून नीरव मोदी, त्याचा भाऊ निशाल मोदी आणि त्याचा कर्मचारी सुभाष शंकर यांच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. सीबीआयनं दाखल केलेलं आरोपपत्र आणि विशेष न्यायाधीश जे. सी. जगदाळे यांनी जारी केलेल्या अटक वॉरंटच्या आधारे इंटरपोलनं चार वर्षांपूर्वी मुंबईतील विशेष न्यायालयात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती.


फरार व्यक्तीच्या विरोधात जारी केलेल्या रेड कॉर्नर नोटीसमध्ये, इंटरपोलने त्याच्या 192 सदस्य देशांना त्या व्यक्तीला अटक करण्यास किंवा ताब्यात घेण्यास सांगितले, त्यानंतर प्रत्यार्पण किंवा हद्दपारीची कार्यवाही सुरू होऊ शकते.


नीरव मोदीनं पीएनबी बँकेत सुमारे 6,500 कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. तो सध्या लंडनमधील तुरुंगात आहे. त्याला परत आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. ईडी नीरव मोदीच्या परदेशातील मालमत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. नीरव मोदीनं 2017 मध्ये त्याच्या कंपनी फायरस्टार डायमंड्सद्वारे आयकॉनिक रिदम हाऊस इमारत खरेदी केली होती. त्याचे हेरिटेज प्रॉपर्टीमध्ये रूपांतर करण्याची त्यांची योजना होती. पीएनबी घोटाळ्यातून मिळालेल्या पैशातून त्याने बहुतांश मालमत्ता खरेदी केल्याची माहिती मिळत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


RBI च्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळं सहकारी बँकांना दणका; ठोठावला 4 लाखांचा दंड