नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 33 व्या 'मन की बात' कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित करताना आणीबाणीच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी बोलताना 25 जून 1975 ची रात्र लोकशाहीसाठी काळरात्र असल्याचं, त्यांनी सांगितलं. याशिवाय रमजान ईदनिमित्त पंतप्रधान मोदींनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या.

आणीबाणीचा उल्लेख करुन पंतप्रधान मोदी म्हाणाले की, ''1975 च्या आणीबाणीच्या आठवणी कुणीही विसरु शकणार नाही. त्या काळात संपूर्ण देशाचं तुरुंगात रुपांतर झालं होतं. 25 जून 1975 ची रात्र लोकशाहीसाठी काळरात्रच होती. ज्या दिवशी संपूर्ण देशाला काळकोठडीचं स्वरुप दिलं गेलं होतं. तसेच याकाळात माध्यमांच्या स्वांतत्र्यांचीही गळचेपी केल्याचं,'' त्यांनी यावेळी सांगितलं.

रामजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. तसेच उत्तर प्रदेशमधील बिजनौरच्या मुबारकपूरमधील मुस्लीम बांधवांनी रमजान महिन्यात राबवलेल्या उपक्रमाचा उल्लेख केला. पंतप्रधान म्हणाले की, ''मुबारकपूरमधील मुस्लिम बांधवांनी आपल्या ईदच्या खर्चात कपात करुन, शौचालयांची उभारणी करुन संपूर्ण देशासमोर एक आदर्श घालून दिला आहे.''

याशिवाय आंध्रप्रदेशमधील विजयनगरममधील उपक्रमाचा उल्लेख करुन येथील नागरिकांचं अभिनंदन केलं. पंतप्रधानांनी सांगितलं की, ''आंध्र प्रदेशमधील विजयनगरम् मध्ये मार्च महिन्यात हागणदारीमुक्त मोहीम राबवण्यात आली. जवळपास 100 तास हे अभियान राबवून 71 गावात 10 हजार शौचालये बांधली,'' अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

तसेच नुकत्याच झालेल्या आतंरराष्ट्रीय योग दिनात सहभागी झाल्याबद्दल देशवासियांचे अभिनंदन केलं. 21 जून रोजी संपूर्ण जग योगमय झालं होतं. या दिवशी देशातील एकाही व्यक्तीनं योगाभ्यास केला नाही, अशी व्यक्ती सापडणार नाही. योग हा जगाला एकमेकांशी जोडण्याचं एक साधन बनल्याबद्दल आनंद व्यक्त केला.