हैदराबाद : अल्पसंख्याकासंदर्भातील जुन्या वक्तव्यावरुन एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी राष्ट्रपतीपदासाठीचे एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्यावर निशाणा साधला आहे.


2010 मध्ये रामनाथ कोविंद यांनी मुस्लीम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्यं केलं होतं. त्यावेळी बोलताना त्यांनी मुस्लिम आणि ख्रिश्चन या देशातले एलियन्स आहेत, अशी टिप्पणी केली होती. त्यांच्या याच वक्तव्याचा संदर्भ देत ओवेसींनी कोविंद आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

हैदराबादमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना, ओवेसी म्हणाले की, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपने रामनाथ कोविंद यांना उमेदवारी दिली आहे. याच रामनाथ कोविंद यांनी 2010 मध्ये एका कार्यक्रमात एक वादग्रस्त वक्तव्यं केलं होतं. ते म्हणाले होते की, मुसलमान आणि ख्रिश्चन या देशासाठी एलियन्स आहेत. याचाच अर्थ आपलं इथं अस्तित्वच नाही.

विशेष म्हणजे, ओवेसींनी यावेळी रामनाथ कोविंद यांना समर्थन देणाऱ्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राजद नेते लालू प्रसाद यादव यांच्यावरही टीका केली आहे. नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव दोघेही ड्रामेबाज असल्याचं त्यांनी यावेळी म्हणलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएच्या घटकपक्षांनी रामनाथ कोविंद यांना समर्थन दिलं आहे. याशिवाय एआयडीएमको, वायएसआर काँग्रेस, बिजेडी, राजद आदी पक्षांनीही रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे.

तर दुसरीकडे काँग्रेसनं या निवडणुकीसाठी मीरा कुमार यांना उमेदवारी दिली आहे. मीरा कुमारी यांना काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी, बहुजन समाजवादी पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, सीपीएम, सीपीआयसह इतर पक्षांनी मीरा कुमारी यांना पाठिंबा दिला आहे.