बंगळुरु: कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि डॅशिंग लीडर समजले जाणारे डी के शिवकुमार (DK Shivakumar) आता ईडीच्या कचाट्यात सापडले आहेत. ईडीने आता डीके शिवकुमार आणि त्यांच्या निकटवर्तीय नेत्यांविरोधात मनी लॉंड्रिंग प्रकरणी चार्जशीट दाखल केली आहे. त्यामुळे शिवकुमार यांच्यासमोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे. याच प्रकरणात डीके शिवकुमार यांना 2019 साली ईडीने अटक केली होती. सध्या ते या प्रकरणात जामीनावर बाहेर आहेत.
ईडीने सप्टेंबर 2018 साली प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉंड्रिंग अॅक्ट अंतर्गत शिवकुमार आणि इतर काही नेत्यांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. हे प्रकरण टॅक्स चोरी आणि हवाला व्यवहारांशी संबंधित असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवकुमार आणि काही नेत्यांविरोधात आयटी विभागाने गुन्हा दाखल केला आहे. शिवकुमार आणि त्यांचे सहकारी एसके शर्मा यांनी हवालाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैशांची देवाण-घेवाण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
ईडीने डीके शिवकुमार यांची मुलगी ऐश्वर्या आणि काँग्रेस आमदार लक्ष्मी हेब्बाळकर तसेच इतर काही जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डीके शिवकुमार यांच्याकडील सुमारे 800 कोटी रुपयांच्या संपत्तीचा कोणताही हिशोब नसल्याचं ईडीने त्यांच्या चार्जशीटमध्ये म्हटलं आहे. ईडीच्या या चार्जशीटनंतर डीके शिवकुमार यांच्याविरोधात मोठी कारवाई करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
डीके शिवकुमार हे काँग्रेसचे बडे नेते आहेत. काँग्रेसची कर्नाटकमधील सत्ता गेल्यानंतर काँग्रेसने त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपावली. डीके शिवकुमार हे कर्नाटकमधील डॅशिंग नेते असून त्यांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष करावे अशीही मागणी अनेकदा होत असते. भाजपला टक्कर देणारा हा नेत्याविरोधात ईडीने आता जाळं टाकलं असून महाराष्ट्रामधील महाविकास आघाडीच्या नेत्यांप्रमाणे त्यांना तुरुंगवारी करावी लागणार की ते सहिसलामत सुटणार हे आगामी काळच ठरवेल.
महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर ईडीने धाडी टाकल्या आहेत. त्यामध्ये अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे तुरुंगात आहेत. ईडीने नुकतंच राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या घरी छापेमारी केली आहे.