लेह : भारत आणि चीन सीमेवर तणाव सुरु असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं सरप्राईज दिलं. सूर्योदय होण्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अचानक लेहमध्ये पोहोचले. भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी पंतप्रधान लेह लडाखमध्ये दाखल झाले. विशेष म्हणजे मोदींच्या या दौऱ्याची अतिशय गुप्तता पाळण्यात आली होती. मोदींचा हा दौरा चीनला एकप्रकारे संदेशही आहे की, "देश आपल्या सैन्याच्या पाठिशी ठामपणे उभा आहे." पंतप्रधान मोदींसोबत चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपिन रावत आणि लष्करप्रमुख एम एम नरवणे हे देखील उपस्थित आहेत.
पंतप्रधान सकाळी लेहमध्ये पोहोचले आणि जवानांची भेट घेतली. महत्त्वाचं म्हणजे याआधी फक्त चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांचाच लेह दौरा पूर्वनियोजित होता. मे महिन्यापासून सीमेवर चीनसोबत तणाव सुरु असून परिस्थिती गंभीर आहे. त्यातच पंतप्रधान मोदीही त्यांच्यासोबत लेहमध्ये पोहोचल्याने सगळ्यांचा आश्चर्याचा धक्का बसला.
याआधी आज केवळ सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह लेहला जाणार होते. परंतु गुरुवारी त्यांच्या कार्यक्रमात अचानक बदल करण्यात आला. तेव्हा फक्त बिपिन रावत लेहमध्ये जातील असं ठरलं होतं. मात्र आज बिपिन रावत यांच्यासोबत मोदीही लेहमध्ये दाखल झाले.
हिंसक झटापटीत भारताचे 20 जवान शहीद
लडाख सीमेवर तणाव सुरु असतानाच 15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली. यामध्ये भारताच्या कमांडिंग ऑफिसरसह 20 जवान शहीद झाले होते. तर काही जवान जखमीही झाले होते. या झटापटीत चीनचंही नुकसान झाल्याचं म्हटलं जातं, परंतु चीनने आकडे जारी केलेले नाहीत.
या घटनेनंतर तणाव सातत्याने वाढत गेले आणि दोन्ही सैन्याच्या वरिष्ठ स्तरावर बातचीतही झाली. परंतु अद्याप कोणताही मार्ग निघू शकलेला नाही. तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख एम एम नरवणे यांनीही लेहचा दौरा केला होता. गलवान खोऱ्यातील झटापटीत जखमी झालेल्या जवानांची त्यांनी भेट घेतली होती.