कानपूर : कानपूरमध्ये लोकल गुंड आणि पोलिसांदरम्यान झालेल्या चकमकीत डीएसपींसह आठ पोलिस शहीद झाले आहेत. तर चार पोलिस गंभीर जखमी आहेत. ही घटना कानपूरच्या शिवराजपूर परिसरात घडली. या ठिकाणापासून काही अंतरावर दुसरी एक चकमक झाली त्यात पोलिसांनी तीन गुंडांचा खात्मा केल्याची माहिती आहे. या घटनेत सीओ देवेंद्र कुमार मिश्रा, एसओ महेश यादव, चौकी इंचार्ज अनूप कुमार, सब-इंस्पेक्टर नेबुलाल, कॉन्स्टेबल सुल्तान सिंह, राहुल, जितेंद्र आणि बबलू हे शहीद झाले आहेत.


पोलिसांच्या माहितीनुसार हिस्ट्रीशिटर असलेला विकास दुबे हा शिवराजपूर गावात लपला असल्याची माहिती होती. त्याला पकडण्यासाठी पोलिस गेले असता एका इमारतीच्या छतावरुन अंधाधुंद गोळीबार गुंडांनी सुरु केला. यात पोलिस उपअधीक्षक एस पी देवेंद्र मिश्रा यांच्यासह आठजण शहीद झाले.


या हल्ल्यानंतर गुंडांनी पोलिसांची हत्यारं घेऊन पलायन केल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी डीजीपी एच सी अवस्थी यांना गुन्हेगारांविरूद्ध कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच या घटनेचा रिपोर्ट मागितला आहे. घटनेनंतर सर्व परिसर सील करण्यात आला आहे.


याबाबत बोलताना कानपूर परिक्षेत्राचे एडीजी जे.एन सिंग यांनी सांगितलं की, या घटनेत आठ पोलिसांचा मृत्यू झाला असून चार पोलीस जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आम्ही गुन्हेगारांना पकडण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन सुरू केले आहे. शेजारील कनौज आणि कानपूर ग्रामीण जिल्ह्यातूनही पोलिसांना बोलावले आहे. गुंडांना शोधण्याचं ऑपरेशन अजून सुरु आहे. अंधाराचा फायदा घेत आरोपी पळाले आहेत.

दरम्यान IG, ADG, ADG (लॉ अँड ऑर्डर) हे या सर्च ऑपरेशनसाठी तिथं दाखल झाले आहेत.  विकास दुबेचं लोकेशन शोधण्यासाठी इलेक्ट्रॉनिक सर्विलांस केलं जात आहे.

कोण आहे विकास दुबे

विकास दुबे का कुख्यात गुंड आहे. त्याची माहिती देणाऱ्याला 25000 रुपयांचा इनाम देखील घोषित करण्यात आला आहे. विकास दुबे हा माजी प्रधान आणि जिल्हा पंचायत सदस्य देखील होता. त्याच्या विरोधात जवळपास 53 हत्येच्या प्रयत्नांचे खटले सुरु आहेत. तो लहानपणापासूनच गुन्हेगारी जगतात नाव कमवू इच्छित होता, अशी माहिती आहे. त्याने गँग बनवून अनेक गंभीर गुन्हे केले आहेत. दरोडे, चोरी, हत्या असे अनेक गुन्हे त्याच्याविरोधात नोंद आहेत. 19 वर्षांपूर्वी त्यानं पोलिस ठाण्यात घुसून राज्यमंत्र्यांची हत्या केली होती.