मुंबई: संत तुकारामांनी आपल्या शिकवणीच्या माध्यमातून समाजाला दिशा दिली आणि विशेषत: दीनदुबळ्यांचं सबलीकरण केलं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देहूतील संत तुकाराम मंदिराच्या शिळा लोकार्पण कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे ट्वीट केलं.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
"मी उद्या पुणे आणि मुंबईमधील कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार असून महाराष्ट्रातल्या बंधू आणि भगिनीना भेटणार आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या देहूतील मंदिराच्या शिळा लोकार्पणाच्या कार्याक्रमामध्ये सहभागी होणार आहे. संत तुकारामांनी आपल्या शिकवणीच्या माध्यमातून समाजाला दिशा दिली आणि विशेषत: दीनदुबळ्यांचं सबलीकरण केलं."
"मुंबईमधील राजभवनमध्ये क्रांतीकारकांच्या चित्रांचे प्रदर्शन असलेल्या गॅलरीचे उद्धाटन करणार आहे. 2016 साली राजभवनमध्ये एख भुयार सापडलं होतं. ब्रिटिशांच्या काळात या भुयाराचा वापर शस्त्रास्त्र ठेवण्यासाठी केला जायचा."
"तसेच या दौऱ्यादरम्यान मी मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सव कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. पत्रकारितेमधील असा दीर्घ टप्पा पार केल्याबद्दल मुंबई समाचारची टीम आणि त्यांच्या वाचकांचे मी अभिनंदन करतो."
कसा आहे पंतप्रधानांचा दौरा?
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (14 जून) देहूत येत आहेत. त्यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. लोकार्पणानंतर दुपारी 2 वाजताच्या सुमारास त्यांची सभा होईल. देहू-देहूरोड मार्गावरील माळवाडीत 22 एकरच्या मैदानात सभा होईल. यासाठी तीन मंडप उभारले असून, चाळीस हजार भाविकांची बैठक व्यवस्था आहे.
पुण्यातील कार्यक्रमानंतर पंतप्रधान मुंबईत येणार आहेत. सी विद्यासागर राव राज्यपाल असताना राजभवनात एक भुयार सापडलं होतं, त्या भुयारात गॅलरी स्थापन करण्यात आली आहे. या गॅलरीमध्ये चाफेकर बंधू तसंच सावरकर बंधू यांची चित्रे आणि प्रदर्शन करण्यात येणार आहे. त्याचं उद्धाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार की नाही याची चर्चा असताना मुख्यमंत्री कार्यालयाकडून उद्धव ठाकरे कार्यक्रमाला हजर राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे बऱ्याच दिवसांनंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान एकत्र एका कार्यक्रमात दिसतील.