नवी दिल्ली : भारतीय मुस्लिम व्यक्तींना 'पाकिस्तानी' संबोधणाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. सरकारने यासंदर्भात कायदा करण्याची मागणी ओवेसींनी संसदेत केली.


भारतात राहणाऱ्या मुसलमानांना पाकिस्तानी म्हटल्याबद्दल दोषी आढळणाऱ्या व्यक्तींना तीन वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात यावा, असं ओवेसी म्हणाले. भाजप सरकार असा कायदा आणणार नाही, असा टोलाही ओवेसींनी लगावला.

भारतातील मुस्लिमांनी मोहम्मद अली जिना यांचा द्विराष्ट्रीय सिद्धांतही नाकारला आहे. मात्र तरीही त्यांना बाहेरच्यांप्रमाणे वागणूक दिली जात असल्याचंही ओवेसी म्हणाले.

केंद्राने मांडलेलं तिहेरी तलाक विधेयक हे महिलांविरोधी असल्याचा दावाही ओवेसींनी केला. तात्काळ तिहेरी तलाकला रद्दबातल ठरवणाऱ्या या विधेयकामुळे पतीला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.