लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच ट्रिपल तलाकबाबत जाहीर वक्तव्य केलं. "धर्माच्या आधारे मुस्लिम महिलांवर अन्याय होऊ नये. माध्यमांनी ट्रिपल तलाकला राजकीय आणि धार्मिक मुद्दा न बनवता, कुरणा जाणणाऱ्यांकडून याबाबत चर्चा घडवून आणावी" असं आवाहन मोदींनी केलं. ते बुंदेलखंडमध्ये आयोजित परिवर्तन रॅलीत बोलत होते.
मुस्लिम भगिनींना समानतेचा अधिकार मिळू नये का? असा सवाल करत फोनवरुन ट्रिपल तलाक देऊन या भगिनींचं आयुष्य बर्बाद करु नका असं आवाहन मोदींनी केलं.
निवडणूक आणि राजकारण त्या-त्या जागी. पण मुस्लिम महिलांना त्यांचा हक्क देणं ही संविधानाच्या दृष्टीने आमची जबाबदारी आहे, असं मोदी म्हणाले.
"माझ्या मुस्लिम बहिणींचा काय गुन्हा आहे? कोणीही उठून तीन तलाक देऊन तीचं आयुष्य उद्ध्वस्त करतो. मुस्लिम भगिनींना समानतेचा अधिकार का मिळू नये? काही बहिणींना हक्कासाठी न्यायालयात लढा दिला. कोर्टाने आम्हाला आमचं मत विचारलं. आम्ही सांगितलं की माता-बहिणींवर अन्याय होता कामा नये. धर्माच्या आधारावर भेदभाव होऊ नये" असं मोदींनी नमूद केलं.
ट्रिपल तलाकच्या मुद्द्याला माध्यमांनी सरकार आणि विरोधी पक्षांचा मुद्दा बनवू नये. भाजप आणि अन्य पक्षांचा मुद्दा बनवू नये, हिंदू आणि मुसलमानांचा मुद्दा बनवू नये. जे कुराण जाणतात त्यांना टीव्हीवर आणून चर्चा करावी, असं आवाहनही मोदींनी केलं.