नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य सभागृहाच्या कामकाजाची वेळ सरकारवर आली. राज्यसभा उपसभापतीपदाच्या निवडणुकीनंतर दोन्ही उमेदवारांना शुभेच्छा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी केलेल्या टिप्पणीचा काही अंश सभागृहाच्या कामकाजातून हटवण्यात आली. मोदींच्या टिप्पणीवर विरोधी खासदारांनी आक्षेप नोंदवला होता.

उपसभापतीपदाच्या निवडणुकीदरम्यान पंतप्रधान मोदी राज्यसभेत उपस्थित होते. निकालानंतर त्यांनी संक्षिप्त वक्तव्यही केलं होतं. दोन्ही बाजूचे उमेदवार हरी आहेत, याचा संदर्भ घेऊन मोदींनी एक विधान केलं होतं. "आता सगळं हरी भरोसे आहे. हरी कृपा सगळ्यावर राहिल, अशी आशा आहे. दोन्ही उमेदवारांच्या नावात हरी आहे. या निवडणुकीत दोन्ही बाजूला हरी होते, पण एकीकडे बीके थे, त्यांच्या नावाआधी बीके होतं, बीके हरी....कोणीही बीके नाही. हरीवंश यांच्यासमोर 'बीके' नाही," असं म्हणत त्यांनी कोटी करायचा प्रयत्न केला होता.

मात्र राष्ट्रीय जनता दलचे खासदार मनोज झा यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला. पंतप्रधानांची भाषा सभागृहाच्या प्रतिष्ठेला शोभणारी नाही. ही टिप्पणी आक्षेपार्ह असून चुकीच्या उद्देशाने केली होती, असं सांगत ते वक्तव्य कामकाजातून वगळण्याची मागणी सभापतींना केली होती. सभापतींनीही यावर विचार करण्याचं आश्वासन दिलं होतं.

यानंतर सभापतींच्या निर्देशानुसार सभागृहाच्या कामकाजातून हे वक्तव्य वगळण्यात आल्याची माहिती राज्यसभेच्या सचिवालयाने दिली. "एखाद्या पंतप्रधानाची टिप्पणी कामकाजातून वगळावी लागणं हे स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं आहे," असा दावा मनोज झा यांनी केला. तसंच सभापतींच्या या निर्णयावर त्यांनी आनंदही व्यक्त केला.

दरम्यान, राज्यसभेच्या उपभापतीपदाची निवडणूक अखेर एनडीएनं जिंकली. सत्तापक्षाकडून जेडीयूचे हरीवंश सिंह यांना 125 तर यूपीएचे उमेदवार बी के हरीप्रसाद यांना 105 मतं मिळाली. राज्यसभेत सध्या 244 खासदार आहेत, पण त्यातल्या 232 खासदारांनीच मतदानात सहभाग घेतला. त्यामुळे बहुमताचा आकडा 117 बनलेला होता. बहुमतापेक्षा 8 मतं अधिक मिळवून सत्ताधाऱ्यांनी या विजयावर शिक्कामोर्तब केलं.