लखनऊ : आपल्या स्वार्थासाठी जनतेला दावणीला बांधणाऱ्या पक्षांना धडा शिकवा, असं आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. एरव्ही कधीही एकमत न होणारे पक्ष नोटाबंदी होताच सरकारविरोधात एकवटले आहेत, असं म्हणत मोदींनी समाजवादी पक्ष, बसपावर तिखट प्रहार केला. इतकंच नाही, तर या सभेतून मोदींनी काँग्रेसचाही समाचार घेतला.


उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये भाजपच्या परिवर्तन रॅलीला नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. ही माझ्या आयुष्यातील भव्य रॅली असल्याचं मोदींनी यावेळी सांगितलं.

देशाचा विकास व्हायचा असेल, तर आधी उत्तरप्रदेशचा विकास झाला पाहिजे असं मत मोदींनी व्यक्त केलं. पण गेल्या 14 वर्षांपासून स्वार्थी राजकारणाच्या वनवासात असलेल्या उत्तर प्रदेशच्या जनतेला विकासाच्या वनवासातून मुक्त करण्याची गरज असल्याचंही मोदी म्हणाले.

यूपीमध्ये विकासाचा वनवास

पंतप्रधान मोदी म्हणाले की, "काही लोक बोलत होते की, भाजपचा 14 वर्षांचा वनवास संपणार. मुद्दा वनवासाचा नाही. भाजप या तराजूमधून राजकारण तोलत नाही. मुद्दा असा आहे की, 14 वर्षांत उत्तर प्रदेशात विकासाचा वनवास झाला आहे. 14 वर्षांनंतर उत्तर प्रदेशच्या भूमीवर पुन्हा एकदा विकासाची नवी संधी आल्याचं चित्र दिसत आहे."

'ते म्हणतात मोदी हटाओ, मी म्हणतो काळा पैसा हटाओ'

तुम्ही कधी सपा आणि बसपाला एकत्र पाहिलं आहे? दोन्ही परस्परविरोधी पक्ष आहेत. पण एवढ्या वर्षात दोन्ही पक्षांची एका मुद्द्यावर सहमती झाली आहे. ते म्हणतात मोदी हटाओ, मी म्हणतो काळा पैसा हटाओ, ते म्हणतात मोदी हटाओ, मी म्हणतो भ्रष्टाचार हटाओ. काय करायचं हा निर्णय तुमचा आहे.

यूपी निवडणूक भाजपसाठी जबाबदारी : मोदी

भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांविरोधातील ही लढाई थांबणार नाही. गरिबांना लुटलं आहे. त्यांना तो पैसा परत देण्यासाठी हे पाऊल उचललं आहे. आम्हाला उत्तर प्रदेशातून आशीर्वाद हवा आहे. इतर पक्षांसाठी ही निवडणूक सत्ता मिळवण्याचा प्रयत्न असेल. कोण आमदार बनणार, कोण मुख्यमंत्री बनणार याचा खेळ असेल. पण भाजपसाठी हा जय-पराजयाचा मुद्दा नाही तर 2017 ची निवडणूक एक जबाबदारी आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे


इतर पक्षांसाठी ही निवडणूक सत्ता मिळवण्याचा प्रयत्न असेल, पण भाजपसाठी 2017 ची निवडणूक एक जबाबदारी आहे : नरेंद्र मोदी

भाजपसाठी यूपी निवडणूक जय-पराजयाचा मुद्दा नाही, ही आमच्यासाठी एक जबाबदारी आहे : नरेंद्र मोदी

भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांविरोधातील ही लढाई थांबणार नाही : नरेंद्र मोदी

देशाची जनताच हायकमांड, आम्हाला दुसरं कोणीही हायकमांड नाही : नरेंद्र मोदी

हे सरकार गरिबांना समर्पित : नरेंद्र मोदी

एक पक्ष पैशांची विल्हेवाट लावण्यात व्यस्त, तर एक पक्ष 15 वर्षांपासून मुलाला प्रस्थापित करण्यात व्यस्त : मोदी

यूपीचं भाग्य बदलल्याशिवाय देशाचा विकास नाही, यावेळी जाती-पातीपेक्षा विकासाला मत द्या : नरेंद्र मोदी

केंद्राने अडीच वर्षात यूपीला अडीच लाख कोटी रुपये दिले,मदतीचा योग्य उपयोग केला असता तर यूपीचा विकास झाला असता: मोदी

यूपीची जनता आजही भाजप सरकारची आठवण काढते, उत्तर प्रदेशात 14 वर्षात विकासाचा वनवास सुरु आहे : नरेंद्र मोदी

'ते' म्हणतात मोदी हटाओ, मी म्हणतो भ्रष्टाचार हटाओ, पर्याय तुम्हीच निवडा : नरेंद्र मोदी

संपूर्ण देशाच्या विकासासाठी उत्तर प्रदेशचा विकास करणं आवश्यक आहे : नरेंद्र मोदी

लखनऊ ही अटल बिहारी वाजपेयींची कर्मभूमी आहे, टीव्हीवर ही दृश्यं पाहून अटलजींना अतिशय आनंद होईल : नरेंद्र मोदी

केवळ उत्तर प्रदेशच नव्हे, संपूर्ण देशाचा विकास हे आमचं ध्येय : पंतप्रधान मोदी

14 वर्षांपासून उत्तर प्रदेशमध्ये विकासाचा वनवास : पंतप्रधान मोदी

प्रधानसेवक म्हणून तुमची सेवा करण्याची संधी मिळाली : नरेंद्र मोदी

निवडणुकीच्या निकालात काय होईल, हे रॅलीतील गर्दीच सांगत आहे : पंतप्रधान मोदी

एवढ्या मोठ्या सभेला संबोधित करण्याचं सौभाग्य मला आयुष्यात कधीही मिळालं नव्हतं : मोदी

उत्तर प्रदेशमध्ये महारॅलीला पंतप्रधान मोदींचं संबोधन