नवी दिल्ली: काही लोकांना फक्त निवडणुका आल्या की जनतेची आठवण येते, पण दहा वर्षाच्या काळात देशाचं सामर्थ्य आणि स्वातंत्र्य दाखवण्याची त्यांनाही संधी होती, पण ते न करता मोदींना शिव्या देऊन काहींना मार्ग निघेल असं वाटतंय अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली. विरोधकांनी ईडीचे आभार मानावं, ईडीमुळेच ते एका मंचावर आले असा टोलाही त्यांनी लगावला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभाराच्या भाषणावर ते बोलत होते. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानींवर टीका केली होती, त्याला नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलं. नरेंद्र मोदी म्हणाले की, हा देश काँग्रेसच्या विचारांच्या बाहेर आहे, काँग्रेसला हा देश कधी समजलाच नाही. विरोधकांनी केलेल्या आरोपांना कोट्यवधी लोकांचं आव्हान पार करावं लागेल, या लोकांना अनेक दशकं वाईट अवस्थेत जीवन जगायला त्यांनी भाग पाडलं. देशातील 143 कोटी नागरिक हे माझं शस्त्रकवच आहेत, खोटे आरोप करुन तुम्ही कधीच याला भेदू शकत नाही. 


अहंकार असलेले लोक मोदींवर आरोप करतात असं सांगत नरेंद्र मोदी यांनी आपल्याला शिव्या देऊन कोणत्याही गोष्टीतून मार्ग निघणार नाही अशी टीकाही केली. आमचं सरकार समाजातील वंचित घटकांचा विकास करण्यासाठी झटत आहे. अनेक दशकं दलितांना आणि आदिवासींना विकासापासून वंचित ठेवण्यात आलं होतं, त्यांचं आम्ही कल्याण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. 


विरोधकांनी  ईडीचे आभार मानावेत, ईडीमुळे ते एकाच मंचावर आले.


ज्या शेतकऱ्याच्या खात्यावर पीएम किसान सन्मान निधी जमा होतोय तो विरोधकांच्या खोट्या आरोपांवर विश्वास नाही ठेवणार. तीन कोटींहून अधिक लोकांना पक्की घरं दिली, ते विरोधकांवर विश्वास ठेवणार नाहीत. देशातील 11 कोटी महिलांना इज्जत घर, शौचालय मिळालं, 9 कोटी महिलांना मोफत एलपीजी देण्यात आले, 8 कोटी परिवाराला नळाचं पाणी मिळालं. हे सर्व लोक विरोधकांच्या आरोपांवर विश्वास ठेवणार नाहीत. 


नरेंद्र मोदी म्हणाले की, "भारतात दोन तीन दशकं अस्थिरता होती. आता स्थिर सरकारही आहे आणि निर्णयही होतात. त्यामुळे त्याचं रुपांतर विश्वासात होतंय. एक निर्णायक सरकार, पूर्ण बहुमताने चालणारं सरकार राष्ट्रहिताचे निर्णय घेण्यात कसूर ठेवत नाहीत. कालानुरुप देशाला जे हवं, तसे निर्णय आम्ही घेत जाऊ. कोरोनाकाळात भारताने जगाला लसीचा पुरवठा केला. कोट्यवधी जनतेला मोफत लस दिली. 125 देशांना जिथे औषधं हवी होती, तिथे औषधं, जिथे अन्य मदत ती केली. त्यामुळेच आज भारताचा जगभरात गौरव होत आहे."


ही बातमी वाचा: