केवडिया:  पुलवामा हल्ल्यासंदर्भात पाकिस्ताननं कबुली दिल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी नाव न घेता राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका केली आहे.  पुलवामा हल्ल्यावेळी काहींनी स्वार्थाचं राजकारण केलं असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला आहे.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरात दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त केवडियामधून संबोधित केलं.


त्यावेळी स्वार्थ आणि अहंकाराचं राजकारण


पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज मी ज्यावेळी या ठिकाणी सैनिकांची परेड पाहात होतो, त्यावेळी माझ्या मनात पुलवामा हल्ल्याचं दृश्य दिसत होतं. वीर जवान शहीद झाल्यानं संपूर्ण देश दुखी होता. मात्र काही लोक या दु:खात सहभागी नव्हते. ते पुलवामा हल्ल्यात देखील आपला राजकीय स्वार्थ पाहात होते, असं पंतप्रधान म्हणाले.


ते म्हणाले की, देश विसरु शकत नाही त्यावेळी काय-काय गोष्टी बोलल्या गेल्या. कशी वक्तव्यं केली गेली. देशावर एवढा मोठा आघात झाला असताना  स्वार्थ आणि अहंकाराचं राजकारण केलं जात होतं, असं मोदी म्हणाले.


पुलवामा हल्ला पाकिस्तान सरकारने घडवला, पाकिस्तानच्या संसदेत मंत्री फवाद चौधरींची कबुली


पंतप्रधान मोदी म्हणाले, काही दिवसांपूर्वी शेजारील देशातील (पाकिस्तान) संसदेत सत्य स्वीकारलं गेलं आणि त्या लोकांचा खरा चेहरा देशाच्या समोर आला. आपल्या राजकीय स्वार्थासाठी हे लोक कुठपर्यंत जावू शकतात, हे पुलवामा हल्ल्यानंतर स्पष्ट झालं, असं मोदी म्हणाले.


पुलवामा हल्ला पाकिस्ताननंच घडवल्याची कबुली
पुलवामा हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानने मोठा गौप्यस्फोट केला आहे. पुलवामा हल्ला पाकिस्ताननंच घडवल्याची कबुली पाकिस्तानच्या संसदेत मंत्री फवाद चौधरी यांनी दिली होती.  भारतानं बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी आणि लष्करप्रमुख बाजवा यांना घाम फुटला होता आणि त्यांचे पाय थरथरत होते, असा गौप्यस्फोट पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य अयाझ सादिक यांनी केला होता. त्यांना उत्तर देताना फवाद चौधरींनी पुलवामा हल्ला हे इमरान खान सरकारचं यश असल्याचं म्हटलं होतं.



अभिनंदनसाठी भारताच्या हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानी मंत्र्याला फुटला होता घाम!