नवी दिल्ली : आज देशाला आत्मनिर्भर होणं आवश्यक आहे. तसंच दुसऱ्या देशांवर अवलंबून राहणं आता कमी करावं लागणार आहे. स्थानिक उत्पादनांसाठी क्लस्टरच्या आधारावर बळकटी देण्यात येत आहे. ईशान्येकडील राज्यांना सेंद्रिय शेतीचं हब बनवण्यावर विचार सुरू आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. जग एक विश्वासार्ह भागीदार शोधत आहे आणि भारताकडे क्षमता, सामर्थ्य आणि कार्यक्षमता आहे. भारतीय उद्योगांनी भारताविषयी जगात जो विश्वास वाढला आहे त्याचा फायदा घ्यावा, असं आवाहन मोदींनी केलं. मोदी यांनी आज इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स (आयसीसी) च्या सत्राला संबोधित केले. यावेळी ते बोलत होते. 95 वर्ष निरंतर देशाची सेवा करणं कोणत्याही संस्थेसाठी मोठी गोष्ट असते. आयसीसीनें पूर्व भारत आणि उत्तर पूर्व भागाच्या विकासासाठी दिलेलं योगदान मोठं आणि ऐतिहासिक आहे, असं मोदी म्हणाले.


कधी-कधी वेळ आपली परीक्षा घेते. अनेकदा कठीण परिस्थिती आणि अशा परीक्षा एकसाथ येतात. मात्र अशा कसोटीच्या काळात आपलं कृतित्व उज्ज्वल भविष्याबाबत गॅरंटी देखील देऊन जातं, असं मोदी म्हणाले. मोदी म्हणाले की, आत्मनिर्भर भारत, स्व विश्वसनीय भारत आपल्याला करायचा आहे. आत्मनिर्भरतेचा हा भाव प्रत्येक भारतीयाने कित्येक वर्षांपासून एक आकांक्षा म्हणून जगला आहे. मात्र ते राहूनच गेलं होतं. मागील 5-6 वर्षात देशातील धोरणांमध्ये भारताला आत्मनिर्भर करणे हेच लक्ष्य मुख्य राहिले आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत मोठ्या बदलांची घोषणा करण्यात आली आहे आणि आता त्या प्रत्यक्षात साकारण्यात येत आहेत, असं देखील ते म्हणाले.

ते म्हणाले की, आता लोकल प्रोडक्ट्ससाठी क्लस्टर बेस्ड अॅप्रोचला भारतात प्रोत्साहन दिलं जात आहे. आज आपण ज्या-ज्या गोष्टी आयात करत आहोत त्या-त्या गोष्टी भविष्यात आपण निर्यात कसे करु शकू या दृष्टीने काम करणं गरजेचं आहे. शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेबाबत जे निर्णय नुकतेच घेण्यात आले. त्यामुळे वर्षानुवर्षे गुलामीत असणारी कृषी अर्थव्यवस्था मुक्त झाली आहे. जग एक विश्वासार्ह भागीदार शोधत आहे आणि भारताकडे क्षमता, सामर्थ्य आणि कार्यक्षमता आहे. भारतीय उद्योगांनी भारताविषयी जगात जो विश्वास वाढला आहे त्याचा फायदा घ्यावा, असं आवाहन मोदींनी केलं.

मोदी म्हणाले की, आपल्याला अनेक वस्तूंची परदेशातून आयात करावी लागते. आपल्याला त्या वस्तू भारतात कशा तयार होतील याचा विचार करावा लागणार आहे. तसंच त्या आपण कशा निर्यात करू शकू हेदेखील पाहावं लागणार आहे. लोकलसाठी व्होकल होण्याची हीच वेळ आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

ते म्हणाले की, सध्या देश फक्त कोरोनाच्या संकटाशी लढत नाही तर अनेक संकटांना एकाच वेळी तोंड देत आहे. देशात चक्रीवादळ, टोळधाड, छोटे-छोटे भूकंप यासारखी अनेक संकटं आपल्यावर ओढावली आहे. त्यामुळे सध्या काळ आपली परीक्षा पाहत आहे. मात्र, असं असलं तरीही आपण अतिशय धैर्याने या संकटाला तोंड देत आहोत, असं मोदी म्हणाले.