जयपूर : अयोध्येतील राम मंदिर प्रकरणी सुरु असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेत काँग्रेस हस्तक्षेप करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. राजस्थानमधील अलवार येथे निवडणुकीपूर्वी आयोजित एका प्रचार सभेत नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. मोदी म्हणाले की, काँग्रेसच्या आडकाठीमुळेच राम मंदिराच्या खटल्याला विलंब होत आहे.


एकीकडे भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या अयोध्येत आहेत. तसेच विश्व हिंदू परिषदेनेदेखील अयोध्येत धर्मसभा आयोजित केली आहे. सेना आणि विहिंपमुळे अयोध्येसह देशभरातील वातावरण तापले आहे. अशा परिस्थितीत मोदींनी राजस्थानमधील सभेत बोलताना अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्याला हात घातला. काँग्रेसमुळे राम मंदिरासंबधी न्याय प्रक्रियेला विलंब होत असल्याचा आरोप मोदींनी केला.

मोदी म्हणाले की, "जेव्हा अयोध्या खटला सुरु होता, तेव्हा काँग्रेसचे एक राज्यसभा खासदार म्हणाले की, 2019 पर्यंत हा खटला सुरु करु नका, 2019 मध्ये निवडणुका आहेत. देशाच्या लोकशाहीवर त्याचे गंभीर परिणाम होतील. यावर न्यायव्यवस्थेला राजकारणात गोवण्याचा काँग्रेसचा प्रकार योग्य नसल्याचे मोदींनी म्हटले आहे."


मोदी एवढ्यावरच थांबले नाहीत, ते म्हणाले की, काँग्रेस न्यायव्यवस्थेवर दबाव टाकत आहे. न्यायाधीशांना धमकावण्याचा, घाबरवण्याचा प्रकार काँग्रेसने सुरु केला आहे. महाभियोगाची भीती दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.