नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत उत्तर दिलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. लोकसभेत भाषणादरम्यान काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींनी मोदींची तुलना थेट इंदिरा गांधींशी केली. त्यावेळी मोदींवर टीका करतांना त्यांची जीभ घसरली होती. यावर बोलतांना पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, माझी त्यांच्यासोबत बरोबरी होऊ शकत नाही. आम्ही कोणासोबत तुलना करण्यात वेळ वाया घालवत नाही. मोठं कार्य करण्यावर आम्ही विश्वास ठेवतो.


संबधित बातमी : पंतप्रधान मोदींची इंदिरा गांधींशी तुलना करताना काँग्रेस नेत्याची जीभ घसरली


लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या भाषणाचा परिणाम दिसत आहे. या निवडणुकीत जनतेने स्पष्ट बहुमत अससेलं सरकार निवडून आणलं आहे. यासाठी देशातील कोट्यवधी मतदारांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आभार मानले. पाच वर्षाच्या कष्टाचं फळ मिळणे, समाधानकारक बाब आहे. आज लोकांमध्ये विश्वास आहे की आम्ही त्यांच्या हिताचं काम करु शकतो. सामन्य जनतेला त्यांचे हक्क मिळायला हवेत आणि आमचं सरकार त्यासाठी काम करेल, असं आश्वासन नरेंद्र मोदींनी दिलं.


देशात 70 वर्षांपासून असलेले आजार दूर करण्याच्या दिशेने आम्ही वाटचाल करत आहोत आणि याचा आनंद आहे. अनेक संकटांचा सामना करत आम्ही त्या दिशेने वाटचाल करत आहोत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं.


आणीबाणीचा हा डाग मिटणारा नाही


आणीबाणीवरुनही मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. 44 वर्षांपूर्वी 25 जून रोजी सत्तेसाठी काँग्रेसने लोकशाही पायदळी तुडवली होती. मात्र आता जनतेने काँग्रेसला त्यांची जागा दाखवली आहे. आणीबाणीच्या काळात प्रसारमाध्यमांवर निर्बंध लावण्यात आले, अवघ्या देशालाच तुरुंग बनविण्यात आलं होते. त्यामुळे आणीबाणीचा हा डाग कधीच मिटणारा नाही, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितले.


आम्ही कोणाची रेष छोटी करण्याच्या भानगडीत पडत नाही तर, स्वतःची रेष मोठी करण्यासाठी जीवनभर झटत असतो. तुम्ही एवढ्या उंच गेला आहात की तुम्हाला जमीन दिसत नाही, तुम्ही मुळापासून वेगळे झाला आहात, अशा शब्दात नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.