नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅंकेची करोडो रुपयांची फसवणूक करुन फरार झालेला आरोपी मेहुल चोक्सीला लवकरच भारतात आणलं जाण्याची शक्यता आहे. अँटिग्वाचे पंतप्रधान गेस्टन ब्राऊन यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे. मेहुल चोक्सीचं अँटिग्वाचं नागरिकत्व मागे घेतलं जाण्याची शक्यता आहे.


"मेहुल चौक्सीचं नागरिकत्व रद्द केलं जाणार आहे आणि त्याचं भारतात प्रत्यार्पण केलं जाणार आहे. आम्ही कोणत्याही गुन्हेगाराला येथे सुरक्षित जागा उपलब्ध करुन दिलेली नाही, जो मोठ्या आर्थिक घोटाळ्यातील गुन्हेगार आहे", असं अँटिग्वाचे पंतप्रधान गेस्टन ब्राऊन म्हटलं आहे.


"सर्व कायदेशीर प्रक्रिया पार केल्यानंतर आम्ही याबाबत परवानगी देऊ. हे प्रकरण न्यायालयात आहे, त्यामुळे प्रत्येक आरोपीला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे", असं गेस्टन ब्राऊन यांनी म्हटलं.


'मला भारतापर्यंतचा प्रवास झेपणार नाही, तेव्हा ईडीच्या अधिकाऱ्यांनीच अँटिंग्वाला चौकशीसाठी यावे, अथवा व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे चौकशी करावी', असा कांगावा मेहुल चोक्‍सीने केला होता. त्यानंतर प्रकृती अस्वास्थामुळे भारतात येण्यास नकार देणाऱ्या मेहुल चोक्सीसाठी 'एअर अँब्युलन्स' पाठवण्याची तयारीही तपासयंत्रणेनं दर्शवली.


मेहुल चोक्सीसोबत त्याचा भाचा नीरव मोदीही पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहे. नीरव मोदी सध्या लंडनमधील जेलमध्ये आहे आणि मेहुल अँटिग्वाचं नागरिकत्व घेऊन तेथे राहत आहे. दोघांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालय आणि सीबीआय चौकशी करत आहे.