महिला दिनी पंतप्रधान मोदींकडून कुंवर बाईंचं स्मरण
एबीपी माझा वेब टीम | 08 Mar 2018 11:40 AM (IST)
'स्वच्छ भारत अभियानासाठी कुंवर बाई यांचं योगदान कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या सत्कृत्यामुळे मी प्रेरित झालो आहे.' असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आयुष्यातील सर्वात प्रेरणादायी महिलेचं स्मरण केलं आहे. गावात स्वच्छतागृह बांधण्यासाठी शेळ्या विकणाऱ्या 106 वर्षीय कुंवर बाईंना मोदींनी सलाम केला. छत्तीसगडमध्ये राहणाऱ्या कुंवर बाई यांनी गावात स्वच्छतागृह बांधण्यासाठी आपल्या उपजीविकेचं एकमेव साधन असलेल्या शेळ्या विकल्या. 15 दिवसांच्या कालावधीत 22 हजार रुपयांमध्ये हे टॉयलेट बांधण्यात आलं होतं. 'स्वच्छ भारत अभियानासाठी कुंवर बाई यांचं योगदान कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या सत्कृत्यामुळे मी प्रेरित झालो आहे.' असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 'छत्तीसगड दौऱ्यावर असताना कुंवर बाई यांचे आशीर्वाद घेण्याची संधी मला मिळाली होती. ते क्षण मी आयुष्यभर लक्षात ठेवीन' या शब्दात मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. काहीच महिन्यांपूर्वी कुंवर बाई यांची प्राणज्योत मालवली. 'बापूंचं स्वच्छ भारताचं स्वप्न साकारण्याच्या ध्येयाने झपाटलेल्या प्रत्येकाच्या मनात आणि हृदयात त्या जिवंत राहतील.' असा विश्वास मोदींनी बोलून दाखवला.