जयपूर : जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं आहे. भारताच्या कूटनितीचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. नरेंद्र मोदींनी यावेळी देशातील नागरिकांना शुभेच्छा देत विरोधकांवर निशाणा साधला.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं की, हा नवीन भारत आहे आणि हा नवीन भारताचा आवाज आहे. भारताने 2019 मध्ये केलेल्या पाचव्या प्रयत्नात चीनला हार मानावी लागली आहे. आज मसूद अझहरला संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं आहे. गेल्या 10 वर्षांपासून भारत यासाठी प्रयत्न करत होता, या प्रयत्नांना आज यश मिळालं आहे. प्रत्येकवेळी चीनने खोडा घालण्याचा प्रयत्न केला, मात्र पुलवामा घटनेनंतर आंतरराष्ट्रीय दबावामुळे चीनलाही भारताच्या प्रस्तावापुढे झुकावं लागलं आहे.



याआधी देशात असं रिमोट कंट्रोलवालं सरकार होतं, ज्यामध्ये पंतप्रधानांचं म्हणणं त्यांच्या सरकारमधील कुणीही ऐकत नव्हतं. मात्र आज संयुक्त राष्ट्रात काय घडलं हे देशाने पाहिलं आहे. देशातील 130 कोटी जनतेचा आवाज संपूर्ण जगाने ऐकला आहे, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं.


मसूद अझहरला दहशतवादी घोषित करणं हे केवळ नरेंद्र मोदीचं यश नाही, तर संपूर्ण देशाचं यश आहे. हा नवीन भारत असून, हा नवीन भारताचा आवाज आहे. मात्र ही केवळ सुरुवात आहे, पुढे बघा आणखी काय काय होतं. आज प्रत्येक भारतीयसाठी अभिमानाचा दिवस आहे. विरोधकांनी या उत्साहाच्या वातावरणात भंग करु नये, असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं.


दहा वर्षांच्या प्रयत्नानंतर यश


अझहर मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतावादी घोषित करण्यासाठीच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये अडथळा आणला जाणार नसल्याचे संकेत चीनकडून नुकतेच देण्यात आले होते. मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्यासाठी भारतासह इतर काही देशांनी चारवेळा प्रयत्न केला होता. पहिल्यांदा 2009 मध्ये भारतानेच प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर 2016 मध्ये पठाणकोट हल्ल्यानंतर भारताने अमेरिका, इंग्लंड, फ्रांससह प्रस्ताव सादर केला होता. 2017 मध्ये अमेरिका, इंग्लंड, फ्रांस या देशांनी पुन्हा एकदा प्रयत्न केला. मार्च 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स या देशांनी पुन्हा एकदा प्रस्ताव सादर केला. अखेर आज मसूद अजहरला संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं आहे.