वाराणसी : बीएसएफचे बडतर्फ जवान तेजबहादूर यादव यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने अवैध ठरवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीमधून आधी अपक्ष निवडणूक लढवत असलेले तेजबहादूर यादव यांना समाजवादी पक्षानं उमेदवारी दिली होती.


तेजबहादूर यांनी 24 एप्रिलला अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी अर्ज भरला होता. त्यानंतर 29 एप्रिलला समाजवादी पक्षाकडून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र दोन्ही वेळा निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज बरखास्त केला. याप्रकरणी सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं तेजबहादूर यांनी म्हटलं आहे.


तेजबहादूर यांचा अर्ज बाद केल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्याविरोधात समाजवादी पक्षाकडून शालिनी यादव यांनी अर्ज भरला आहे. वाराणसीतील जनता याला उत्तर देईल आणि जनतेचा आवाज मतांच्या रुपात ऐकू येईल, अशी प्रतिक्रिया उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दिली आहे.


जानेवारी 2017 मध्ये तेज बहादूर यांनी बीएसएफच्या जवानांना दिले जाणारे जेवण हे निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमुळे तेज बहादूर चर्चेत आले होते. बीएसएफने त्यानंतर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत निलंबित केले होते. तेच तेजबहादूर युद्धाच्या मैदानातून आता निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.