नवी दिल्ली: देशात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अनेक वर्षांपासून चालत आला आहे, त्यातच आता सुरक्षेच्या नावावर त्यांचं स्वातंत्र्य देखील काढून घेतलं जात आहे. कुणी काय कपडे घालावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. भारतात महिलांना कपडे घालण्यावरून कोणतेही बंधन नाही. एकीकडे महिला सक्षमीकरण करण्यावर भर दिला जात आहे, तर दुसरीकडे एक महिलाच समाजासमोर आपली दूषित मानसिकता मांडते. असाच एक प्रकार दिल्लीमध्ये घडला.


"या मुलींना लहान कपडे घालून अंगप्रदर्शन करत सर्वाना आकर्षित करायचे आहे, ज्या महिला असे लहान कपडे घालतात त्यांच्यावर बलात्कार होतो" असे शब्द एका काकूंने दिल्लीतील मुलींना उद्देशून वापरले. सध्या एका वायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये हा प्रकार दिसून आला. झालं असं की या काकूंना एका मुलीचा शॉर्ट ड्रेस खटकला, इतके लहान कपडे घालणाऱ्या मुलींवर बलात्कार व्हायला हवा असं या बाईने म्हटलं. हा प्रकार एका हॉटेलमध्ये घडला, पण त्याचा काही पुरावा नसल्यामुळे मुलींच्या समूहाने काकूंना पुन्हा मॉलमध्ये गाठले. व्हिडीओ शूट करुन काकूंना या प्रकाराबद्दल माफी मागायला या मुलींनी सांगितलं.

मिनी स्कर्ट घातलेल्या तरुणीवर बलात्काराचा महिलेचा सल्ला?



माफी न मागितल्यास आम्ही हा व्हिडीओ वायरल करु असं सांगितल्यावर देखील या महिलेने माफी मागितली नाही, तर व्हिडीओ नक्की वायरल करा असं काकू म्हणाल्या. प्रकरण इथेच थांबलं नाही, हा प्रकार घडत असताना मुलींची बाजू घेऊन मॉलमध्ये आलेल्या एका महिलेनेदेखील काकूंना समजवण्याचा प्रयत्न केला पण तोही व्यर्थ ठरला कारण मुलींचं समर्थन करत असल्यामुळे तुमच्यावर देखील बलात्कार होईल असं या काकूंने म्हटलं.

ज्या मुलीला या काकूंने शेरेबाजी केली त्या मुलीने दहा मिनिटांचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आणि काकू एका रात्रीत वायरल झाल्या. नुकत्याच जन्माला आलेल्या मुलींवर बलात्कार होतो, साडी नेसणाऱ्या आजींवर बलात्कार होतो याला काय कारण, असं विचारल्यानंतर, बलात्कार करणारे पुरुषच विकृत असल्याचं काकू म्हणाल्या. संपूर्ण भारताने हा व्हिडीओ पाहायला हवा असं ही बाई म्हणाली. हा व्हिडीओ तब्बल 10 लाखांपेक्षाही जास्त लोकांनी पाहिला. इन्स्टाग्रामने मात्र काही वेळात हा व्हिडीओ डिलीट केला.

तुम्ही मॉलमध्ये जा किंवा रस्त्यावरील बाजारात, मराठीत बोला किंवा इंग्रजीत, जर तुमचे विचारच दूषित असतील तर तुमचं शिक्षण किंवा भाषा तुम्हाला खरं ठरवत नाही याचं हे उत्तम उदाहरण आहे.