नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राज्यसभेतील भाषणात झारखंड मॉब लिचिंग घटना, चमकी ताप यावर आपलं मौन सोडलं. यावेळी नरेंद्र मोदींनी विरोधकांवर पुन्हा एकदा निशाणा साधला. ईव्हीएमवर संशय व्यक्त करणाऱ्या विरोधकांना नरेंद्र मोदींनी चांगल धारेवर धरलं.


भाजप जिंकला म्हणजे लोकशाही हरली आणि देश हरला, असं बोललं जात आहे. मग वायनाडमध्ये देश हरला का? काँग्रेसचा पराभव झाला तर देशाचा पराभव झाला, ही मानसिकता चुकीची आहे. काँग्रेसने देशातील नागरिकांचा आणि मतदारांचा अपमान केला आहे. एवढा अहंकार योग्य नाही. देशावर 55-60 वर्ष राज्य करणाऱ्या पक्षाला 17 राज्यांमध्ये एकही जागा जिंकता आली नाही. काँग्रेसने आमच्यावर टीका करावी, मात्र देशाचा अपमान करु नये, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं.


'एक देश, एक निवडणूक' यावर चर्चा करण्यासाठी नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीत बैठक बोलवली होती. या बैठकीत काँग्रेसचा कोणताही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. यावरुनही मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.


मॉब लिंचिंगसाठी संपूर्ण झारखंडला दोषी ठरवणं चुकीचं


झारंखडमधील मॉब लिंचिंगची घटना दुर्दैवी आहे. झारखंड मॉब लिंचिंगचा अड्डा बनलं आहे, असं बोलणं चुकीचं आहे. संपूर्ण झारखंडला दोषी ठरवणं अयोग्य ठरेल. जे घडलं त्याचा निषेध करायला हवा, मात्र यासाठी सर्वांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं चुकीचं आहे. संपूर्ण झारखंडची बदनामी करणे टाळालं पाहिजे. झारखंडमध्ये चांगली लोकंही राहतात. आरोपींवर योग्य कारवाई करण्यात येईल आणि शिक्षा देण्यासाठी न्यायालय आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं.


बिहारमध्ये लहान मुलांचा मृत्यू लाजिरवाणी बाब आहे


बिहारमधील चमकी ताप आमचं सर्वात मोठं अपयश आहे.  बिहारमधील लहान मुलांचा मृत्यू आपल्यासाठी लाजीरवाणी बाब असल्याचं मोदींनी म्हटलं.  आपल्याला याबाबत गंभीरतेने विचार करायला हवा. सध्याच्या बिकट परिस्थितीतून लवकरत बाहेर पडू, असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. मी बिहार सरकारच्या संपर्कात असून केंद्रीय वैद्यकीय मंत्री डॉ. हर्ष वर्धन हे देखील याबाबत पाठपुरावा करत आहेत, अशी माहितीही मोदींनी दिली. या आजारावर लवकरच योग्य उपाय शोधला जाईल आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी प्रतिक्रिया नरेंद्र मोदींनी दिली.