भाजप आमदाराची गुंडगिरी, पाडकाम करण्यासाठी आलेल्या पालिका कर्मचाऱ्याला बेदम मारहाण
एबीपी माझा वेब टीम | 26 Jun 2019 03:18 PM (IST)
या भागात जोरदार पाऊस पडणार असल्याच्या सूचना पालिकेच्यावतीने देण्यात आलं होतं. अशातचं पालिकेच्या वतीनं जीर्ण घरं खाली करण्यात येतं होती.
इंदूर : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांचा मुलगा आणि भाजप आमदार आकाश विजयवर्गीय यांनी गुंडगिरीचा कळस गाठलाय. इंदूरमध्ये पालिकेच्या अधिकाऱ्याला आकाश यांनी चक्क क्रिकेटच्या बॅटनं मारहाण केलीय. आकाश यांचा हा व्हिडीओ चांगलाचं व्हायरल होत आहे. इंदूरमध्ये पालिकेचे अधिकारी एका जर्जर घराचं तोडकाम करण्यासाठी आले होते. त्यावेळी भाजप आमदार आकाश विजयवर्गीय तिथं पोहोचले आणि त्यांच्यात वाद झाला. परंतू हा वाद एवढा विकोपाला गेला की, क्रिकेटची बॅट थेट पालिकेच्या अधिकाऱ्यांवर उचलून मारहाण केली आहे. एवढेच नव्हे तर आकाश यांच्या समर्थकांनी पालिकेच्या अधिकार्यांनाही मारहाण केली. या भागात जोरदार पाऊस पडणार असल्याच्या सूचना पालिकेच्यावतीने देण्यात आलं होतं. अशातचं पालिकेच्या वतीनं जीर्ण घरं खाली करण्यात येतं होती. भाजप आमदार आकाश विजयवर्गीय हे याआधीही आपल्या वादग्रस्त विधानांवरुन चर्चेत आले होते. लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात वादग्रस्त शब्द वापरले होते. त्यावेळी आकाश यांनी ‘राहुल गांधी पहले तो पप्पू थे, लेकिन अब गधों के सरताज बन गए हैं’ असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.