नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प पुढच्या महिन्यात सादर होणार आहे, त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अर्थतज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील तज्ञांबरोबर चर्चा केली. या चर्चेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी तज्ज्ञांची मते जाणून घेतली आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील हा पहिला अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण 5 जुलै रोजी लोकसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या बैठकीत निती आयोगाने ‘इकोनॉमिक पॉलिसी- द रोड अहेड’ या चर्चा सत्राचे आयोजन केलं. यामध्ये एकूण 40 अर्थतज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले होते. या कार्यक्रमात जाणकारांनी अर्थव्यवस्था, रोजगार, शेती, जलसिंचन, निर्यात, शिक्षण आणि आरोग्य या विषयांवर आपली मते मांडली, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
अर्थतज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेले सल्ले आणि मार्गदर्शनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे आभार मानले. या बैठकीत केंद्रीय मंत्री पियुष गोयल, केंद्रीय मंत्री इंद्रजीत सिंह, निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार आणि इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
VIDEO | फिर एक बार, शिवशाही सरकार, मुख्यमंत्री राज्यात रथयात्रा काढणार