नवी दिल्ली : स्थानिक प्रशासन, राज्य सरकारं ज्या जबाबदारीचं पालन करत आहेत, त्यांची कोरोनाविरोधातल्या लढ्यात खूप मोठी भूमिका आहे. त्यांचे हे परिश्रम अत्यंत प्रशंसनीय आहेत.  आज, देशाच्या कानाकोपऱ्यातनं लोक स्वच्छता कामगारांवर पुष्पवर्षाव करत असल्याची छायाचित्रं येत आहेत. डॉक्टर असो, पोलिस असो, व्यवस्थेबद्दलही सामान्य लोकांच्या मानसिकतेत मोठं परिवर्तन घडलं आहे. पोलिसिंगची मानवीय आणि संवेदनशील बाजू आमच्यासमोर आली आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी  रेडिओ कार्यक्रम 'मन की बात' च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.


यावेळी ते म्हणाले की, अलिकडेच जो अध्यादेश आणला आहे, त्याबद्दल समाधान व्यक्त केलं गेलं आहे. यात, कोरोना योद्ध्यांबरोबर जे हिंसा, छळ करण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्याविरोधात अत्यंत कडक शिक्षेची तरतूद आहे. आमचे डॉक्टर, परिचारिका, यासर्वांचं संरक्षण करण्यासाठी हे पाऊल अत्यंत आवश्यक होतं, असं ते म्हणाले.

आपल्यातील बहुतेकांना हे ठाऊक असेल की देशातल्या प्रत्येक भागात औषधे पोहचवण्यासाठी आपण #LifeLineUdan मोहिमेद्वारे देशातल्या देशातच, 3 लाख किलोमीटर अंतराचं हवाई उड्डाण केलं आहे आणि 500 टनाच्यापेक्षाही जास्त वैद्यकीय साहित्य, देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आपल्यापर्यंत पोहचवलं आहे, असं मोदी यांनी सांगितलं. भारतीय रेल्वेनं जवळजवळ 60 पेक्षा जास्त रेल्वेमार्गांवर 100 हून जास्त पार्सल ट्रेन्स सुरू केल्या आहेत. औषधांचा पुरवठा करण्यात, आमच्या टपाल खात्याचे लोक, अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत. आमचे हे सर्व साथीदार खऱ्या अर्थानं कोरोनाचे योद्धेच तर आहेत, अशा शब्दात त्यांनी कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं.

ते म्हणाले की, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत गरिबांच्या खात्यांमध्ये, पैसे थेट जमा केले जात आहेत. वृद्धावस्था पेन्शन जारी केली गेली आहे. गरिबांना तीन महिने विनामूल्य गॅस सिलेंडर, रेशनसारख्या सुविधा प्रदान केल्या जात आहेत. मी, राज्य सरकारांचीही प्रशंसा करतो की ते या महामारीचा सामना करण्यात अत्यंत सक्रिय भूमिका बजावत आहेत, असंही मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले की, आपण कुठेही पाहिलंत तर, आपल्याला याची जाणीव होईल की, भारताची लढाई लोकांनी चालवलेली आहे. पूर्ण जग या महामारीच्या संकटाशी मुकाबला करत आहे. भविष्यात जेव्हा याची चर्चा होईल, तेव्हा भारताच्या या लोकांनी चालवलेल्या लढाईची चर्चा होणारच, असा मला विश्वास आहे. भारताची कोरोनाच्या विरोधातील लढाई ही खऱ्या अर्थाने लोकांनीच नेतृत्व केलेली आहे. भारतात कोरोनाच्या विरोधातील लढाई जनता लढत आहे, आपण लढत आहात, जनतेबरोबरीने एकत्रितपणे शासन, लढत आहे. विकासासाठी प्रयत्नशील भारतासारखा विशाल देश, गरिबीशी निर्णायक लढा देत आहे. या परिस्थितीत आपण सर्व देशवासियांनी जी संकल्प शक्ति दाखवली आहे, त्यानं, भारतात एका परिवर्तनाची सुरूवात झाली आहे. आमचे व्यवसाय, आमची कार्यालये, आमचे वैद्यकीय क्षेत्र, प्रत्येकजण, वेगानं, नव्या तांत्रिक बदलांकडे पुढे निघाला आहे, असंही मोदी म्हणाले.